Saturday, 31 March 2018

© प्रमोद जोशी

Sunday, 25 February 2018

अनएक्स्पेक्टेड एक्झिट

सिनेसृष्टीतली ‘चांदणी’ निखळली
‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातील ८ मिनिटांचा ‘चार्ली चॅप्लिन’चा प्रसंग आज तिने जगाचा निरोप घेतला आहे या बातमीवर विश्वासच बसत नाही. सहज सुंदर अभिनय आणि त्यातली निरागसता ही बहुदा श्रीदेवी जन्माला येतानाच घेऊन आली असावी. भूमिका जगणे काय असते ते जर बघायचे असेल तर श्रीदेवीचे सिनेमा पाहून आपल्याला कळते.


पाहताना आपली हसून हसून मुरकुंडी वळते. या प्रसंगाबद्दल असा एक किस्सा सांगितला जातो की जिम कॅरी या हॉलिवूड मधल्या कलाकारालाही श्रीदेवीचा हा अभिनय आवडला होता. आपण असे भाव चेहऱ्यावर कधीही आणू शकत नाही अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली होती.

सोलवा सावन मधून श्रीदेवीने १९७८-७९ च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत पुढची १८-१९ वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य करत राहिली. ‘सदमा’ या सिनेमातली मनोरुग्ण मुलीची भूमिका असेल तिचे ते कुत्र्याच्या पिल्लाला पाहून ‘हरिप्रसाद’ असे ओरडणे असेल. किंवा ‘चाँदनी’ सिनेमातली प्रियकरावर असीम प्रेम करणारी प्रेयसी असेल, ‘नगीना’ सिनेमातली इच्छाधारी नागीण असेल. सगळ्याच भूमिका श्रीदेवीने अजरामर केल्या. अत्यंत निरागस आणि सोज्ज्वळ भाव तिच्या चेहऱ्यावर आपसूकच आलेले दिसून येते. 

श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते. तिला एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा तिचा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. 

श्रीदेवीला ‘सदमा'(१९८४), ‘चांदनी'(१९९०), ‘खुदा गवाह'(१९९३), ‘गुमराह'(१९९४), ‘लाडला'(१९९५), ‘जुदाई'(१९९८), ‘इंग्लिश विंग्लिश'(२०१३) आणि ‘मॉम'(२०१८) या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच इतरही अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान करण्यात आला. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि सुंदर कारकीर्द असलेली श्रीदेवी यापुढे फक्त आठवणीत असणार आहे. तिच्या गाण्यांतून, सिनेमांतून ती आपल्याला भेटत राहील. सिनेसृष्टीतली ‘चांदणी’ निखळली असली तरीही प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान ध्रुवपदाइतकेच अटळ राहिल यात शंका नाही.

(  छायाचित्रे अंतरमहाजालावरून साभार    )

© प्रमोद जोशी

Wednesday, 17 January 2018

गुरुवार

गुरुवार म्हणजे दत्ताचा वार. 

भाविक गुरुवारी दत्ताची भक्ती करतात. दर्शन घेतात. उपवास करतात. दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश म्हणजेच GOD.  देव म्हणजे साहेबांच्या भाषेत  GOD.
आता GOD ला थोडसं आणखी जाणून घेऊया.


G म्हणजे  Generates किवा निर्माण. हे कार्य  ब्रम्हदेव करतात. 

O म्हणजे  Operates किवा पालन पोषण करणे.हे कार्य विष्णू देव करतात.
D म्हणजे  Destroy किवा  नाश करणे. हे कार्य शंकर – महेश करतात.

देव म्हणजे एक अदृश्य अशी शक्ती आहे. देव दाता आहे. तो मनोभावे मागितले कि सर्व देतो अशी एक श्रद्धा आहे.

पण मित्रानो, खरे सांगू. देव मागितलेले सर्व देत नाही आणि न मागतानाही दिल्या शिवाय राहत नाही. आपण जेव्हा देवाकडे काही मागतो, तेव्हा त्याचा अर्थ ते आपल्याकडे  नाही असा होतो. काही वेळा जे मिळाले आहे ते टिकावे म्हणून प्रार्थना करतो. मला तर असं वाटतं कि आपली गरज आणि लायकी ही आपल्यापेक्षा देवालाच  जास्त माहित असते. 

आपल्याला आयुष्यात जे हवे आहे ते मिळेल ह्याची खात्री नसते. त्यामुळे जे मिळाले आहे त्यावर प्रेम करण्यास शिकले पाहिजे.

खरं तर आपण आत्ता या क्षणी आहोत हेच मुळी त्याच्या कृपा आशीर्वादामुळे. 
मला या चार ओळी लिहिण्याची  स्फूर्ती व शक्ती तोच तर देतोय.

आजकाल आपण formality म्हणून एकमेकांना thanks म्हणत असतो. 
मग ज्याने आपल्याला आजचा दिवस दाखवला, त्याचा आनंद उपभोगू दिला त्या देवाचे निदान रात्री निद्राधीन होण्यापूर्वी एकदा नामस्मरण करून आभार मानले तर काय हरकत आहे. 

काय माहित उद्या मिळेल किंवा नाही.


© प्रमोद जोशी

Saturday, 13 January 2018

तिळगुळ घ्या गोड बोला !!!



तिळगुळ घ्या गोड बोला !!!

© प्रमोद जोशी

भोगीची भाजी

पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती! मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस! स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन (ह्या भाजीत तिळाचा वापर आवश्यक असतो) एक भाजी केली जाते. 
ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा देवाला खास नैवैद्य दाखविला जातो.
ह्या भाजीला 'मिक्स वेजेटेबल' असेही म्हणतात. काही वेळा 'खेंदाट' असे पण म्हणतात. काही का असेना , पण भाजी असते मात्र खूप टेस्टी. आणि आजच्या दिवशी काय माहित पण खूपच टेस्टी म्हणजे जास्तच गोड लागते. आधीच मुळात थंडी असल्याने या दिवसात भूक जरा जास्तच लागते. आणि त्यात ही लज्जतदार थाळी भूक आणखीनच चाळवते.
मग, का थांबलात करा सुरवात जेवायला !!!

Monday, 8 January 2018

काळजाला भिडणारी कविता

शालेय अभ्यासक्रमात काही काही कथा कविता अशा असतात की त्या  लहानपण असूनसुद्धा काळजाला लगेच भिडतात. 

आणि त्यातून शिकवणारे अध्यापक जर जीव ओतून शिकवत असतील तर....घी में शक्कर !!!
खरच अशा शिक्षकांना मानाचा मुजरा....

कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या..
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला..
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान..
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण..
“अहा, आली ही पहां भिकारीण”
पंकसंपर्के का कमळ भिकारी..?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी..?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी..?
कशी तुही मग मज मुळी भिकारी..?
नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू..
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते..?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना..?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया
“गावी जातो” ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, “येते मी, पोर अज्ञ वाचा..!”
-कवी बी ( नारायण मुरलीधर गुप्ते )



© प्रमोद जोशी

झी युवाचे प्रेक्षक... आणि अंजली....


झी युवा ही वाहिनी खूप चांगल्या चांगल्या मालिका देतीय... त्यामुळे प्रेक्षक वर्ग तिकडे खेचला जातोय....
सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेली "अंजली" मालिका जी मराठी मधील प्रथमच हॉस्पिटल वरची आधारित मालिका आहे. सर्व casting नि आपल्या भूमिकांना न्याय दिलाय.... पण आता सध्या एक twist आलाय आणि त्यामुळं कदाचित , आणि काही प्रेक्षक वर्गाला तो twist आवडला नसेल कदाचित.... पण त्यावर सोशल मेडिया वर बरच बोललं जातय ... म्हणजे असं का , तसं का वगेरे वगेरे.

शेवटी मालिकाच ती....

पण ती शेवटपर्यंत लोकांना निखळ आनंद देईल कारण प्रेक्षकांची अंजलीवर असीम भक्ती आहे त्यामुळं तिला यश तर मिळेलच ... नाही का...?

बाकी ही मालिका आनंद देतेय हे मात्र नक्की...

संवाद लेखन उत्कृष्ट आहे त्यामुळे प्रत्येक क्षण अप्रतिम...


अंजली व असीम यांच्यातील क्षण 

पण मला एक कळत नाहीये कि, मालिकेचा कणा डॉक्टर खानापूरकर यांना केव्हा आणणार आहेत.... खरं तर त्यांच्या शिवाय प्रत्येक एपिसोड अपूर्ण आहे....

तुम्हाला काय वाटतं....


© प्रमोद जोशी
(फोटो आंतरजालावरून साभार)

Sunday, 7 January 2018

देव

देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन विचारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात. देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मतआहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे.
 देव सर्वव्यापी आहे आणि तो सगळ्यात आहे.आणि तो कोणत्याही माध्यमातून, रूपातून अभिव्यक्त होऊ शकतो, प्रकट होऊ शकतो ही भावना ज्या प्रमाणे असंख्य लोकांच्या मनात आहे  
त्याच प्रमाणे मी देव मानत नाही , माझी मेहनत , माझे कष्ट यांवर माझा विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही असे मानणारे सुद्धा अनेक आहेत.आपल्याकडे आस्तिक हे संख्येने खूपच जास्त आहेत. नास्तिकपणा हा केवळ एक भूमिका म्हणून स्वीकारलेली भावना नसते तर देव असण्याची विचारधारा त्यांना पटत नसते म्हणूनच ती स्वीकारलेली असते. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोट्या पडद्यावर अवतरली आहे.


श्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या देवाची गोष्ट देवा शप्पथ या मालिकेतून गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पहायला मिळते आहे.  ही मालिका झी युवा मार्फत प्रसारित केली जात आहे. 
या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिश च्या भूमिकेत क्षितिश दाते आहे तर त्याच बरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोकच्या भूमिकेत संकर्षण कऱ्हाडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे , शाल्मली टोळ्ये , अभिषेक कुलकर्णी , कौमुदी वालोकर चैत्राली गुप्ते , आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत .
झी युवा ही अगदी अल्पावधीत लोकप्रिय झालेली मराठी वाहिनी आहे. झी युवा ही वाहिनी एक वेगळं आणि फ्रेश कन्टेन्ट देण्यासाठी आजच्या प्रेक्षकांमध्ये ओळखली जातेय. देवाशप्पथ ही एक पूर्णपणे वेगळीसंकल्पना असून या मालिकेतून देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत, पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवत आहेत. त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळत आहे.

बघू या पुढे काय काय घडते ते.

(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

© प्रमोद जोशी

Monday, 1 January 2018

नव वर्षाचे स्वागत




         नवीन वर्ष सर्वाना सुखाचे व समृद्धीचे जावो 



नवीन वर्ष


                             Happy New Year 2018              



(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)               

Sunday, 31 December 2017

नवं वर्ष,नवी दृष्टी

नवं वर्ष,नवी दृष्टी

नवीन वर्ष आणि सोमवार हे समीकरण एकदा जुळून आलं की मग आपला आनंद गगनात मावेनासा होतो.  कोणतंही नवीन चांगलं काम करायला मी  एक तारीख, सोमवार किंवा गुरुवार निवडतो. आणि समजा जर कॉम्बिनेशन आलंच तर मग काय दुधात साखरच.

आता आज मला नव्या उमेदीने काहीतरी सुरुवात करायचीय, कारण उद्या सोमवार पण आहे आणि एक जानेवारी पण. असं कॉम्बिनेशन दरवर्षी थोडंच येतं.

ह्या सोमवारी म्हणजे एक जानेवारीला दोन हजार अठरा या वर्षाचं स्वागत करताना एवढं नवं कोरं वर्ष त्या विधात्याने आपल्या झोळीत टाकल्या बद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानले पाहिजेत, नाही का?

   कारण त्याने अजून पर्यंत तरी श्वास दिलाय म्हणूनच मी हे करू शकतोय.

आज माझ्या मनात घर करून राहिलेल्या सगळ्या प्रेरणाहीन, नकारात्मक व भीतीदायक अशा सैतानाला मारून काहीतरी नवं करायचं आहे, मानसिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.  माझ्यावरची जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यास मला सज्ज व्हायचंय.

एकविसाव्या शतकातील या अठराव्या वर्षात पदार्पण करताना मी माझ्यात नक्कीच बदल घडवतोय, तयार होतोय येणारं आयुष्य झेलायला,अधिक मजबूत व ताकदवान होउन... स्वप्नं साकारायला, स्वप्नं बघायला आणि सदैव फ्रेश रहायला.

तुम्हाला सर्वाना नववर्षाच्या शुभेच्छा...
हॅपी न्यू इयर...
© प्रमोद जोशी

प्रिय २०१७

प्रिय २०१७,


सस्नेह नमस्कार,

       गेल्या एक जानेवारीला तू आलास. २०१६ ची नाळ जोडूनच आलास... त्याचीही काही अर्धवट कामं सोबत घेऊन अगदी फाईली बरोबर घेऊनच. 

      तू वेगाने मार्गक्रमण करीत राहिलास. आज अखेरचा दिवस - ३१ डिसेंम्बर. प्रत्येक वर्षाला अखेर असते आणि दिवसाला एक रात्र. दिवस, संध्याकाळ, रात्र मध्यरात्र असा धावत धावत तू इथपर्यंत पोहोचलास. आज तू साथ सोडून जाणार हे खरंच क्लेश दायक वाटतंय. 

       एखाद्याच सोडून जाणं हे किती वेदना देणारं, क्लेश देणारं, मनाचा कोलाज बिघडवून टाकणारं  असतं हे किती जणांनी  तुझ्या साक्षीनच अनुभवलं  आहे. त्यांच्या  सर्व आप्त स्वकीयांप्रमाणच तू सुद्धा त्यांच्या  वेदनांवर फुंकर घातली आहेस. खरं सांगू  या कालचक्राच्या रहाटगाडग्या मधून , चरितार्थाच्या गतीत, सतत काही ना करण्याच्या उर्मीत आज ३१ डिसेंबर कधी आला ते कळलच नाही.

अन आता एकदम मन अंतर्मुख झालंय, एकदम रिकामं रिकामं वाटतंय. 

माझ्यातली तीव्र संवेदन क्षमता आणि प्रकाश झोत अंधुक झाल्यासारखं वाटू लागलंय. कुणीतरी जाणार हेच मन आताशा मानत नाहीये. 
अरे आपला बाप्पा पुढच्या वर्षी येण्याचं वचन देऊन जातो तरी आमचे डोळे पाणावतात, अगदी ५ दिवस आमच्या सोबत असला तरी.
मग मला सांग गेले वर्षभर ३६५ दिवस तू साथ दिली आहेस आणि आता जाण्याचा दिवस आलाय... तो ही परत कधीच न येण्यासाठी! 

खरच अगदी भरून आलंय, हे असं का व्हावं...

हे वर्ष, ह्या वर्षातल्या बऱ्या वाईट घटना, दुःख व मानापमानाचे प्रसंग, कटू शब्द, आजवर जगलेले सर्व आयुष्य....या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली म्हणून असेल कदाचित! गत वर्षाचं, कटू व गोड गतानुभवांचं, दुःख वेदनेचे विसर्जन करायला जमेल आपल्याला, या जाणिवेने सुद्धा कढ आले असतील...

असो, पण हे मित्रा तू मला तुझ्या कारकिर्दीत खूप सांभाळून घेतलंस, अरे मोडून पडलेल्या या मित्राला इतरांप्रमाणे तू पण हात दिलास... अरे गेल्या १ वर्षाची मैत्री आपली पण तू खरच चांगली निभावलीस. तुझ्या दोन भावांनी म्हणजे २०१५ व २०१६ नी तर मला अक्षरशः तारून नेलं. 

मला माहिती आहे, मी तुला अधून मधून भेटत जा म्हंटल तरी ते शक्य नाही, ब्रम्हदेवाच्या कालमापन प्रोटोकॉल मध्ये बसत नाही ते.....

असो, थँक्स... गुडबाय... टेक केयर

अलविदा २०१७  🙏


© प्रमोद जोशी

फुलपाखरांचे अंतरंग - ३

फुलपाखरांचे अंतरंग -३

हे सॅम, hi

Hi, मानस, आज एकटाच, वैदेही कुठंय!

अरे, समीर! येईल ती , म्हणजे निघालीय, पोहोचेल.

बरं बाकी सगळी कुठं आहेत, आज प्लॅन फिक्स आहे ना celebration चा!

अलबत, हे काय विचारणं झालं का?

ओके. समीर, ग्रेट!

ये ती बघ वैदेही पण आली, hi वैदेही!

Hi मानस, hi समीर!

बरं चला उशीर झालाय आधीच पटकन जाऊ या कॅन्टीनमध्ये!

कॅन्टीन मध्ये आधीच बाकी सगळे जमा आहेत ते बघून... hi friends! Good morning,

गुड मॉर्निंग वैदेही,

"काय अमित , वर्षाला आज निरोप द्यायचा ना !, आं आं काय!" वर्षाकडे तिरप्या नजरेने बघत गौरव म्हणाला.

"तू न गौऱ्या आता मार खाणार आहेस, बरेच दिवस धुतला नाही तुला..." अमित म्हणाला.

"मी कुठं काय केलंय, मी आपलं वर्षाला निरोप द्यायचं म्हणत होतो... ह्या ह्या वर्षाचा कंटाळा आला न आता.." वर्षाकडे बघत गौरव म्हणाला.

"गौरव !" वर्षानं गौरवला डाव्या हातानं एक सपाटा दिला.

काही सेकंद शांतता ... फक्त कॅन्टीन मधील किचन म्युझिक.

"ये वर्षा, बघ ना बघता बघता एक वर्ष संपलं, आणि नवीन वर्ष सुरु होतय...काही तासात." वैदेही म्हणाली

 "हो ना कधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन .... पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत असतं नै ... " समीर म्हणाला.

"खर तर काय बदलत ? कॅलेंडरच पान पालटतो आपण नेहमीसारखे .... पण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतुहलाने ..." मानस म्हणाला,

" दोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते , या वर्षीचा संकल्प काय करायचा ....????? संकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड ... याच विचारात होते आणि वाटलं , नव्या वर्षाला काय वाटत असेल येताना ???? " वैदेही म्हणाली.

"चुकून काही भावना किंवा बुद्धी असेल च त्याला , तर नवीन वर्ष काय Feel करत असेल १ January ला !!!???" केतन म्हणाला,

"खूष होत असेल की घाबरत असेल ??? जाणार वर्ष काही हितगुज करत असेल का नव्या वर्षाशी ??? मोठ्ठ्यांनी सल्ला देण्याचा रिवाज ' वर्ष ' पण पाळत असतील का ???? खूष होत असेल न येणार वर्ष ,आपल आगमन धुमधडाक्यात साजर होतंय हे बघून , गर्व वाटत असेल त्याला ही थोडासा !!!" अमित म्हणाला.

"म्हणजे काय अमित, नक्कीच वाटत असणार ; " वर्षा म्हणाली,

"ठरवत असेल का एखाद वर्ष , आपण एखाद्या माणसाला काय देऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं त्याच्याकडून ????  , कदाचित घाबरत ही असेल एखाद वर्ष ... भीती वाटत असेल त्याला त्याच्या स्वतःच्याच नशिबाची ...!!", केतन म्हणाला.

"हो ना आपण lucky नाही ठरलो तर एखादा माणूस नेहमीच आपल्याला ' फालतू वर्ष ' म्हणून लक्षात ठेवेल या भितीन , झोप लागत नसेल वर्षांनाही ...!!! हो ना वर्षा," अमित म्हणाला,

"एखाद वर्ष अविस्मरणीय ठरत असेल खूप सुखाचे चार क्षण देऊन , खूष करून टाकत असेल एखाद वर्ष माणसांना ...!!!" मानस म्हणाला,

" वर्षहि उत्सुकतेन वर्तमानपत्रात भविष्य बघत असतील .... आपल्याला काय काय करायचं याच Time -Table ठरवत असतील त्यानुसार ...!!! एखाद वर्ष चिडत असेल आदल्या वर्षावर , त्यान स्वतःच एखाद काम आपल्यावर ढकललं म्हणून .... " गौरव म्हणाला,

"किंवा एखाद वर्ष खूष होत असेल , मागच्या वर्षीच्या प्रयत्नांच फळ आपल्या काळात मिळाल म्हणून !!! " केतन म्हणाला.

"अरे हो हो हो, हे काय चाललंय, माझ्या तत्वज्ञानी मित्रानो,आपल्याला व्याख्यानाची तयारी नाहीये करायची...." समीर म्हणाला,

" बरं ते जाऊ दे ... सध्यातरी ३१ च celebration काय करायचं हे ठरवू या, नाही का? .... " वैदेही म्हणाली,

"आणि समीर हे काय तन्या कुठंय! " वर्षा म्हणाली,

"ते बघा, शंभर वर्षे आयुष्य आहे तुला ...!!!!" तन्याकडे पाहत मानस म्हणाला.

"तर friends,आता कोरम भरलाय, तेव्हा.....ए गौऱ्या तोपर्यंत १० वडे सांग..." समीर म्हणाला,

"पुरतील ना तेवढे, का आणि १० सांगू..." अमित म्हणाला, आणि हास्याचे फवारे उडाले.


© प्रमोद जोशी

Monday, 25 December 2017

शाकंभरी

       कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यात बदामी शहरापासून सहा मैलाच्या अंतरावर 'चोलचगुडू' या नावाचं एक लहानसं गाव असून, तिथे 'शाकंभरी' देवीचं स्थान आहे. या भागाला प्राचीनकाळी 'तिलकवन' असं नाव होतं, असा उल्लेख स्कंदपुराण आणि देवी भागवतात येतो. 
         फार प्राचीन काळी एकदा या भागात शंभर वर्षांचा दुष्काळ पडला होता. तेव्हा अन्न- पाण्यावाचून सर्व प्राणिमात्र तडफडू लागले. मानवासह सर्व प्राणी भूक- तहानेने व्यावूत्ळ झाले. तेव्हा सर्व जीवमात्राचं पालनपोषण करणार्‍या दयामयी देवी भगवतीला करुणा आली आणि तिने सर्वांना वाचविण्यासाठी हे एक नवे रूप घेतले.

         देवीनं आपल्या देहातून शाकभाजी अर्थात फळ, कंदमुळं निर्माण केली. त्याचबरोबर पाताळात जाऊन 'हरिद्रातीर्थाचं' पाणी आणून लोकांची क्षुधा तृष्णा भागवली. त्यांचं रक्षण केलं. देवीनं आपल्या देहातून शाकभाजी निर्माण केली म्हणून तेव्हापासून तिचं नाव 'शाकंभरी' असे पडलं. 
        शाकंभरी देवीला 'बदामी- बनशंकरी' असंही म्हणतात. तिलकवनात देवीनं पाताळातून हरिद्रातीर्थाचं पाणी आणल्यामुळे तिथं द्यान्य, भाजीपाला, झाडंझुडपं, फळांचे वृक्ष बहरले. लोकांना अन्नद्यान्यामुळं जीवदान मिळालं. मात्र, या क्षेत्राचा असा झालेला उत्कर्ष दैत्यांना पाहवला नाही. त्यांनी तिथे जाऊन अन्नद्यान्याची नासधूस करून सर्व लोकांना त्रास दयायला सुरुवात केली. तेव्हा देवीने वाघावर स्वार होऊन आपल्या नऊ कोटी सखींसह दैत्यांवर चाल केली आणि त्यांचा निःपात केला. 
      देवीचा हा पराक्रम पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हरिद्रातीर्थ आणि तैलतीर्थ यांच्यामध्ये देवीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली. तीच ही शाकंभरी देवी. ती वनामध्ये निवास करून राहिली म्हणून तिचं नाव 'बनशंकरी' असं झालं. तिलकवनात जेव्हा दुष्काळ  पडला, तेव्हा देवीनं आपल्या शंभर नेत्रातून दयादृष्टी  या भागावर टाकली आणि उत्तम पाऊस झाला म्हणून तिला 'शताक्षी' असंही म्हणतात, असा उल्लेख श्री शिवपुराणातल्या उमासंहितेत केला आहे.

        शाकंभरी ही 'धन धान्य  समृद्धीची' देवता आहे. तिच्याच कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणार्‍या जोमदार धान्य पिकांमध्ये मोत्यासारख्या टपोर्‍या दाण्याची कणसं अवतीर्ण होतात.
        एकदा अरुण नावाच्या महाअत्याचारी असुराने स्वर्गातल्या देवांच्या पत्नीचं शील हरण करण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हा सर्व देवपत्नी आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी भ्रमराची रूपं घेऊन देवीभगवतीकडे अभय मागण्यासाठी आल्या. तेव्हा देवीनं 'भ्रामरी'चं रूप घेऊन अरुण दैत्याचा संहार केला. तेव्हापासून तिला 'भ्रामरी' हे नाव प्राप्त झालं.
          देवी भगवतीच्या 'रणरागिणी स्वरूपातील' ही  दोन महत्त्वाची रूपे म्हणजे 'शाकंभरी' आणि 'भ्रामरी'. देवीचं 'शाकंभरी' हे रूप अन्नपूर्णास्वरूप आहे. कर्नाटक प्रांतात ही देवी फार प्रसिद्ध असून, ती अनेकांची कुलदेवता आहे. पौष महिन्यात शुद्ध पक्षात अष्टमी ते पौर्णिमा असं या देवीचं नवरात्र करतात.

या देवी सर्व भुतेषु। क्षुद्यारुपेण संस्थिता।
नमः तस्यै नमः तस्यैः। नमः तस्यैः नमो नमः॥

© प्रमोद जोशी

Sunday, 24 December 2017

नाताळच्या पूर्वसंध्येच्या अनेक शुभेच्छा! 😊




सगळ्यांना .....
नाताळच्या पूर्वसंध्येच्या अनेक शुभेच्छा!
आपणा सर्वांसाठी सांताक्लॊज पोतडीभरून सुख घेऊन आलाय......
आत्मविश्वास, विद्या, चांगुलपणा, मेहनतीची प्रवृत्ती व हिम्मत, कष्टाची तयारी, आनंदी वृत्ती, उत्तम आरोग्य, थोरामोठ्यांचे आशीर्वाद व प्रेम सगळे कसे ठासून भरलेय त्याच्या थैलीत.

उघडताय ना दार?      काय?  








© प्रमोद जोशी

प्रसार माध्यमातील कलह

सहज आठवलं...

मागे एकदा दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती... काहीशी अशा आशयाची ..

कोल्हापुरात खपात 'सकाळ' नंबर वन'

लगेच दुसऱ्याच दिवशी ‘दै. पुढारी’ने पण इंडियन रिडरशिप सर्वेचा दाखला देत प्रत्त्युत्तर केलं होतं...

 “दुपटीहून अधिक वाचकसंख्येने पुढारीच्या निर्विवाद वर्चस्वावर पुन्हा शिक्का मोर्तब”

खरं तर या सगळ्याला सुरवात तशी बऱ्याच आधीपासून झाली होती. म्हणजे बघा पुढारीने जेव्हा पासून पुण्यात पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासून या वादाला तोंड फुटत गेलं. कदाचित आपण सगळ्यांनी हे याची देही याची डोळा बघितलेच असेल; पुढारीने ज्यावेळी पुणे आवृत्ती चालू केली त्यावेळी त्यांची जाहिरातच काहीशी अशी होती

“आता ‘सकाळचं’ पाहिलं काम ‘पुढारी’ वाचायचं!!!”;

पी एम टी च्या अनेक बसेसवर हि जाहीरात त्यावेळी झळकत होती. आता पुढारीने अशी जाहीर कुरापत काढल्यावर सकाळ कसं गप्प बसेल?

गपा की राव!!!

त्यांनी मग कोल्हापूर आवृत्तीचे दर बिझनेस पोलीसी च्या नावाखाली कमी केले आणि मग ‘मिडिया वॉर’पेटलं; जवळपास आठवडा भर कोल्हापुरात हे धुमशान चालू होतं. पुढारीने विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा मुद्दा हाताशी धरून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेला आपल्या बाजूने केलं; आणि मग काही वृत्तपत्र विक्रेत्यानी दै. सकाळ वर बहिष्कार टाकला.

दै. सकाळने हि मग माघार न घेता वितरणाची समांतर यंत्रणाच उभी केली. प्रथम नाव न घेता होत असलेल्या टीका नंतर वैयक्तिक पातळीवर होऊ लागल्या. याचाच परिपाक म्हणून सकाळ कोल्हापूर आवृत्ती चे संपादक पद दस्तूर खुद्द अभिजीत पवारांकडे आलं.

वास्तविक पाहता या वादाचा इतिहास फार जुना; मला वाटतं जेव्हा पासून दै. सकाळ न कोल्हापुरात पाय ठेवला तेव्हांपासून या वादाची ठिणगी पडली असावी, त्याच्या अगोदर दै. पुढारीची आणि त्यांच्या“परीवारा”चीच कोल्हापुरात मोनोपॉली होती; त्याला सकाळने दिलेले आव्हान पुढारीला आवडले नसावे त्यामुळेच पुढारीचा हा डबल द्वेष जन्माला आला असावा.

पुढे काय झालं माहित नाही; पण साधारण काही दिवसांनी तो वाद बहुधा थंड झाला. लोकांचे फुकट मनोरंजन करण्यापलीकडे यातून काही साध्य झालं असेल असं काही वाटत नाही. पण परत परत ह्याच आशयाच्या बातम्यांनी हेच दाखवून दिले कि वाद जरी वरवर थंड झाला असला तरी आत कुठेतरी अजून ठिणगी धुमसते आहे.

आता पुढारी आणि सकाळ यात तुलना करायचीच झाली तर दोन्ही दैनिक वर्तमान पत्रे आहेत हा एक मुद्दा सोडला तर साम्य असे काही नाहीच.

सकाळ खरे तर ब्राम्हणी ढंगाचे पुणेरी दैनिक; सौम्य भाषेतून आशयपूर्ण आणि सृजनशील लिखाण बुद्धीजीवी लोकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा असलेले; तर पुढारी म्हणजे ‘अस्सल कोल्हापूरी’ चटपटीत भाषेत लोकांचे मनोरंजन करणारे दैनिक. दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग पूर्ण वेगळा पण तरीही त्यांच्या मधील हि इर्षा खरच अनाकलनीय आहे.


जाऊ दे आपल्याला काय करायचाय आपण तरी सकाळ आणि पुढारी दोन्ही पेपर रोज वाचतो तेहि इंटरनेट वर अगदी फुकटात; काय?

जाऊ द्या...

त्यांच्या त्यांच्यात काय घडतंय त्याच्याशी आपल्याला काय करायचंय.....

उगाच आपलं देणं ना घेणं अन कंदील लावून येणं...

आपण आपलं आपलेच सप्तरंग आणि आपलीच विविधा म्हणत त्यांना थोपटायच अंगाई गीत म्हणत...
नाई का?

© प्रमोद जोशी

Friday, 22 December 2017

कठीण समय येता....

        या जगात क्वचितच असा एखादा माणूस सापडेल की ज्याला जीवनामध्ये कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागलेले नाही. जोपर्यंत जगणे सुरु आहे तोपर्यंत सुख आणि दु:ख हि खिलारी जोडी आपल्याला साथ देत असते. पण एक आहे की कोणत्याही प्रसंगातून गेल्यावर आपणाला काही तरी शिकायला मिळतं; मग तो प्रसंग आनंदी असू दे किंवा क्लेशदायी. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रसंग त्या व्यक्तीला, त्याच्या आप्तस्वकीयांना काही तरी शिकवून जातो. इतिहास साक्षीदार आहे की ज्या व्यक्ती अशा कठीण प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्या आहेत त्यांनाच पुढे यश मिळालेले आहे. एवढंच नव्हे तर सातत्त्याने यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. जो माणूस अशा कठीण प्रसंगात सुद्धा न खचता धैर्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तोच पुढे एखादया आयडॉल पुरस्काराने सन्मानित होतो.

     खरं तर कठीण प्रसंगातून जाताना मी काय,तुम्ही काय , आपण सगळेच विचलित होतो . आता काय ? हा प्रश्न आपल्यापुढे असतो. पण आपल्याला तर प्रसंगाशी दोन हात करून त्याला तोंड द्यायचं असतं. न डगमगता आपणाला अशा प्रसंगाशी लढायला शिकायचं असतं. पण बऱ्याच वेळा आपलं अवसान गळून जातं. प्रसंगी नैराश्य, हताशपणा येतो.

      स्वामी विवेकानंद म्हणतात, अशा कठीण काळात जर तुमचा खरा मदत करणारा कुणी असेल तर ते तुम्ही स्वतः असता. तुम्ही स्वतःच तुमचे खरे मदतगार असता. 

जेव्हा केव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून, अडचणीतून जात असाल तेव्हा तुम्ही क्षणभर विसरून जा की तुम्ही अडचणीत सापडले आहात. तुम्ही तुमची हि अडचण तुमच्या जवळच्या कोणत्या तरी प्रिय व्यक्तीची आहे असं समजा. आणि शांत व थंड डोक्याने तुम्ही विचार करा की आपल्या या प्रिय व्यक्तीला यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय मार्ग काढाल, त्या व्यक्तीला तुम्ही काय सल्ला दयाल. मग बघा तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला संकट मुक्त करण्याचा एखादा तरी कवडसा मिळतो की नाही. 

    आणि एकदा कवडसा मिळाला की काय अवघड आहे प्रकाश शोधणं. आणि खात्री बाळगा की तुम्हाला हा प्रकाशरूपी आशेचा किरण सगळं काही व्यवस्थित करण्यास मदतच करतो.

बऱ्याच लोकांना अशा कठीण प्रसंगात मनातल्या मनात कुढण्याची , स्वतःला दोषी ठरवून त्रास  करून घ्यायची सवय असते. माझ्याच बाबतीत असं का होतं, देवाला दुसरं कोणी सापडत नाही का, का माझ्याच मागे तो हात धुवून लागलाय असं म्हणून स्वतः बरोबरच दुसऱ्याला पण मानसिक त्रास देण्याची सवय असते.  जवळ जवळ प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्यावर जे संकट आले आहे ते फार मोठे आहे, आजपर्यंत कुणावरही असे संकट आले नसेल. हे असं का वाटतं कारण आपण इतर जणांना पण काही समस्या आहेत का याचा कधीही विचार केलेला नसतो. आणि त्यामुळेच आपल्याला वाटतं की आपल्यावरच पहाड कोसळला आहे. खरं तर आपल्यापैकी आपल्या एखादया सहकाऱ्याला याहीपेक्षा मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलेले असतं. त्यानेही खंबीरपणे तोंड देत स्वतःला यातून बाहेर काढण्याचं बळ तुमच्या सारखच मिळवलेलं असतं. पण फक्त आपल्याला आणि आपल्यालाच असं वाटते की मी म्हणूनच यातून बाहेर पडलो , दुसरं कोणी असत तर केव्हाच त्याचं "अटॅक फटॅक सटॅक " झालं  असतं, म्हणजे तो या कठीण प्रसंगाचा बळी ठरला असता.. 

       खरं तर ईश्वरान प्रत्येकाला मन दिलंय, विचार करण्याची शक्ती दिलीय पण शेवटी हा मनुष्य स्वभाव आहे.  आणि तो बदलता येतो. पण बदलणे हा आपला स्थायीभाव असला पाहिजे. 

जगातले जवळ जवळ सर्व तत्ववेत्ते सांगून गेलेत की, जर तुमचं मन नकारात्मक विचार करत असेल तर नकारात्मक उर्जा  लहरी तयार होतील आणि जे चांगल घडणार आहे त्यामध्ये पण कदाचित अनेक अडचणी येऊ शकतील, पण तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल तर सकारात्मक उर्जा लहरी उत्पन्न होतील आणि जे अनुचित घडणार आहे ते सुद्धा कदाचित ते सुद्धा हि सकारात्मक उर्जा टाळू शकेल. लक्षात ठेवा,कठीण समय येता आपणच आपल्या कामास येतो.

So, be Positive. 




© प्रमोद जोशी

Thursday, 21 December 2017

उशीर पथ्यावर

नुकतीच वाचनात आलेली एक विलक्षण घटना.

गुहागर मुंबई ST बस एका धाब्यावरून जेवण करून निघणार होती. प्रचंड पाऊस पडत होता आणि दोन प्रवासी न चढल्यामुळे कंडक्टर त्यांना शोधायला छत्री घेऊन उतरला होता. केवळ दोघे आले नाहीत म्हणून बस निघू शकत नसल्याचे पाहून प्रवासी वैतागले होते.

"ओ मास्तर चला जाऊ द्या, त्यांना राहू द्या इथच पावसामध्ये!" एकजण वैतागून ड्रायव्हर ला म्हणाला. "तेच ना जहागीरदार आहेत काय, ST म्हणजे काय यांच्या बापाचा माल आहे काय?" आणखी एक जण हेल काढत पचकला. पण ड्रायव्हर महाराज शांत होते , त्यांच्यासाठी हे रोजचेच होते. त्यांनी एकसारखा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. आणि एकदाचे कंडक्टर साहेब त्या दोघांना घेऊन आले. सर्व प्रवासी एखाद्या कैदयाकडे पाहावे असे त्यांच्याकडे पाहू लागले.

आणि एकदाची बेल दोनदा वाजली आणि बस पावसात मार्गक्रमण करू लागली. मागून एक जीप भरदाव वेगानं बस ला ओव्हरटेक करून गेली. पण थोड्याच वेळात ती रस्त्यावरून उलट वळली व बस च्या दिशेने यायला लागली. नक्कीच काहीतरी वेगळे घडलंय याची ड्रायव्हर ला जाणीव झाली, त्याने बसचा वेग कमी केला व जीप वाल्याला विचारायचा प्रयत्न केला. पण जीप पुन्हा भरदाव वेगाने बसच्या उलट दिशेने निघून गेली. काहीच मिनिटांनी ड्रायव्हर च्या लक्षात आलं कि सावित्री नदीच्या पुलाच्या तोंडावर एक व्यक्ती हात करून थांबण्याचा इशारा करत आहे. त्याने गाडी जवळ नेऊन थांबवली तर त्या माणसाने सांगितले कि पूल मध्यावर तुटलाय आणि दोन बस व चार पाच गाड्या खाली कोसळून वाहून गेल्यात! ते ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर काटा आला. खरे म्हणजे त्या तिन्ही बस एकापाठोपाठ जातात. पहिल्या दोन बस निघून गेल्या पण या बसमधील दोन प्रवाशांनी पाच दहा मिनिटे यायला वेळ लावला व त्यामुळं सर्वांचा जीव वाचला.

थोडक्यात काय त्या दोघांच उशिरा येणं सर्वांच्या पथ्यावरच पडलं , नाही का?




© प्रमोद जोशी

Tuesday, 12 December 2017

नशीब

मनुष्य हा एक असा प्राणी आहे की त्याच्या आयुष्यात केव्हा काही घडेल हे कधी सांगता येत नाही. नशिबाचे फेरे त्याच्या बाबतीत कधी कसे पडतील याची काही शाश्वती देता येत नाही. नशिबाच्या अचानक पडलेल्या फाशांमुळे माणूस कसा दुर्दैवी असतो हे बऱ्याच वेळा दिसून येते.

नुकतेच एक सत्य घटना वाचण्यात आली.

मुंबईतील एका चाळीत निरुत्तर करणारी एक घटना घडली होती. ती चाळ एका बिल्डरला देण्यात आली. बिल्डरने सर्वाना सांगितले कि नियमाप्रमाणे तुम्हाला सध्या जेवढी जागा आहे तेवढी देण्यासाठी मी बांधील आहे. पण चाळीतल्या सर्वच खोल्या शंभर दीडशे फुटाच्या आहेत. नव्या बिल्डींग मधील सर्व फ्लॅट पाचशे फुटाच्या पलीकडे असणार आहेत. तेव्हा तुम्ही वरच्या स्क़ेअर फुटाचे पैसे द्या म्हणजे तुम्हालाही अधिक जागा वापरायला मिळेल. अर्थातच सर्वांनी ते मान्य केले. पण एका कुटुंबाकडे तेवढे पैसे नव्हते. कारण त्यांचा मुलगा मतीमंद होता. त्यांनी पै पै जमा केली होती ती त्याच्या भविष्यासाठी ! बिल्डर म्हणाला कि ठीक आहे. तुम्हाला तुमच्या जागेची बाजारभावाने येणारी किंमत देतो, तुम्ही जागेचा ताबा सोडा. पण ही जागा सोडून मुंबईत ते कुठे जाणार? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली होती.

    आणि अचानक एक घटना घडली. एक दिवस बिल्डर चा मुलगा चाळी समोरच्या रस्त्याने गाडीने जात असताना त्याच्या गाडीखाली सापडून एक मुलगा मृत्युमुखी पडला. तो नेमका या दाम्पत्याचा मुलगा होता! सर्व सोपस्कार पार पडल्यावर बिल्डरने त्या दाम्पत्यासमोर हात जोडून प्रस्ताव ठेवला कि कृपया केस मागे घ्या. मी तुम्हाला एक फ्लॅट फुकट देतो. त्या दुर्दैवी माता पित्याला प्रश्न पडला कि मुलगा जिवंत होता तोपर्यंत फ्लॅट घेणे अशक्य होते. आता त्याच्या मृत्यूमुळेच फ्लॅट मिळतोय! मग या जागेच्या आनंद व्यक्त करायचा कि दु:ख ? 

नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते.

खरोखर किती बिकट प्रसंग असतात आयुष्यात, नाही का?



© प्रमोद जोशी

Monday, 4 December 2017

एक था गुल

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ही बातमी न्यूज च्यानेल वर आली आणि मन सुन्न झालं.  एका जेष्ठ अभिनेता दिग्दर्शकाला रसिक कायमचे मुकले असं वाटून गेलं. 

बेखुदी में सनम .....
एक था गुल और एक थी बुलबुल...  
ओ मेरी शर्मिली.....
खिलते है गुल यहां...
नि सुलताना रे...
तुम बिन जाऊ कहां...
चंचल शीतल निर्मल...
घुंघरू कि तरह बजता ही रहा हुं ...

यासारखी किती तरी  गाणी  डोळ्यासमोर तरळून गेली जी अजूनही लोकांच्या मनात घर  करून आहेत.

शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरविषयी जेव्हाही चर्चा होते तेव्हा त्यांचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. पडद्यावरील आणि पडद्यामागील यांच्या मैत्रीची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना, चाहत्यांना भावली.


‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘शान’, ‘त्रिशूल’, ‘सुहाग’, ‘दो और दो पांच’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र भूमिका साकारली. त्याकाळी शशी आणि अमिताभ यांच्या जोडीला इतकी प्रसिद्धी मिळाली की दिग्दर्शक त्यांना घेऊन चित्रपट निर्मिती करण्यास उत्सुक असायचे.

अभिनय क्षेत्रातला चंद्र म्हणून कोणा अभिनेत्याचे नाव घ्यायचे असेल तर ते शशी कपूर यांचे घेतले पाहिजे. अभिनेता, निर्माता अशा भूमिका लिलया पेलत हा हरहुन्नरी कलाकार कायम सिनेमा व्यापत राहिला. आज हा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. एका मोठ्या प्रवासाला त्याची सुरुवात झाली आहे. सिनेसृष्टीच्या आकाशातून चंद्र निखळला आहे अशीच काहीशी भावना सिनेरसिकांच्या मनात आहे.

खरेतर अभिनयाचे बाळकडू शशी कपूर यांना घरातूनच मिळाले होते. वडिल पृथ्वीराज कपूर, भाऊ राज आणि शम्मी कपूर यांच्यासोबत शशी कपूर यांनीही अभिनय क्षेत्रातच करियर करायचे ठरवले. बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांनी १९४० पासून मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या ‘आग’ आणि ‘आवारा’ या दोन सिनेमांमध्येही त्यांनी सुरूवातीला काम केले. शशी कपूर म्हटले की स्मित हास्य करत आपल्या सहज अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता लोकांच्या समोर यायचा.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा वयाने मोठे असूनही शशी कपूर यांनी ‘दिवार’ सिनेमात त्यांच्या लहान भावाची भूमिका स्वीकारली. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अँग्री यंग मॅनला ‘मेरे पास माँ है’ असे शांत आणि संयतपणे सांगणारा त्याचा लहान भाऊ शशी कपूर यांनी ज्या ताकदीने साकारला त्याला जवाब नाही. अमिताभ आणि शशी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी फक्त दिवार सिनेमात नाही तर ‘सुहाग’, ‘त्रिशूल’, ‘नमकहलाल’, ‘सिलसिला’ ‘कभी कभी’ या सिनमांमध्येही बघायला मिळाली. सिनेमा अमिताभ यांच्याभोवती केंद्रीत असला तरीही शशी कपूर यांची भूमिका मात्र खास असायची. त्यांनाही बघण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करत असत. इतकेच नाही तर नलिनी जयंत, माला सिन्हा, तनुजा, नंदा यांसारख्या अभिनेत्रींपासून त्यांनी अगदी रेखा, राखी, नीतू सिंग यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. ‘जब जब फूल खिलें’ या सिनेमातील त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यातील गाणी चांगलीच गाजली.

त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी हा देखील त्यांच्या अभिनया इतकाच हिट विषय आहे. ‘खिलते हैं गूल यहाँ’, ‘घुंगरूकी तरह बजताही रहाँ हूँ मै’, ‘परदेसीयोंसे ना अखिया मिलाना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ही आणि अशी अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली गेली. कपूर कुटुंबातील हॅण्डसम अभिनेत्यांमध्ये शशी कपूर यांचा चार्म आणि त्यांच्या नुसत्या हसण्यानेच कित्येक तरुणी त्यांच्यावर फिदा होत्या. किंबहुना एक वेळ तर अशीही होती की, त्यांच्या चार्मसमोर रुपवान अभिनेत्रींचे सौंदर्यही फिके पडले होते राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या त्रिकूटाने हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. पण, एक देखणा अभिनेता म्हणून तरुणींकडून शशी कपूर यांना विशेष पसंती मिळाली.

प्रेयसीवर प्रेम करण्याची त्यांची अनोखी पद्धत, नुसत्या हसण्याने तिचा राग कुठतच्या कुठे पळवण्याची त्यांची अदा आणि मोठ्या उत्साहात एखाद्या गाण्यावर थिरकण्याचा त्यांचा अंदाज आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत शशी कपूर यांच्या वाट्याला बरीच प्रसिद्ध गाणी आली. ‘ओ मेरी शर्मिली’पासून ते अगदी ‘खिलते है गुल यहाँ’ पर्यंतच्या प्रत्येक गाण्यामध्ये त्यांच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहणयाची संधी प्रेक्षकांना मिळाली. 

‘वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ’, या गाण्यात शर्मिला टागोरसोबत फ्लर्ट करणाऱ्या शशीजींच्या अदा, ‘एक था गुल एक थी बुलबुल’ या गाण्यातून अनेकांच्या काळजाला भिडल्या. चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील चमक आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणाऱ्या या अभिनेत्याची ही वैशिष्ट्ये चित्रपटसृष्टीत त्यांना वेगळं स्थान देऊन गेली. अशा या  अभिनेत्याला विनम्र श्रद्धांजली ....

अलविदा शशिदा...   


© प्रमोद जोशी

Thursday, 23 November 2017

स्वर्ग

एक प्रवासी आपल्या घोडा व कुत्र्याला घेऊन रस्त्यावरून चालला होता. जेव्हा ते एका मोठ्या विशालकाय अशा झाडाजवळून जात होते तेव्हा त्यांच्यावर आकाशातून एकदम वीज पडली आणि ते तिघे त्याच क्षणी मरण पावले. परंतु त्या तिघानाही आपण जिवंत नसल्याची जाणीव झाली नाही आणि ते चालतच राहिले. कधी कधी मृत शरीरांना आपला शरीरभाव सोडावयास वेळ लागतो.
त्यांचा प्रवास खूप लांबचा होता. आकाशात सूर्य चांगलाच तळपत होता. त्या तिघानाही खूप दम लागला होता. घामाने डबडबले होते आणि तहान पण खूप लागली होती. ते पाणी शोधत शोधत निघाले होते. रस्त्याच्या वळणावर त्यांना एक भव्य दिव्य असं द्वार दिसलं जे पूर्णपणे संगमरवरी होतं. त्या द्वारातून ते एका स्वर्ण जडित मंडपात आले. तिथून पुढे बरोबर मध्यभागी एक कारंजा होता आणि त्यातून पांढरे शुभ्र स्वच्छ पाणी फवारले जात होते.
तो प्रवाशी पहारेकऱ्याला म्हणाला "नमस्कार दादा, किती सुंदर जागा आहे हो !".
"हा स्वर्ग आहे." तो पहारेकरी म्हणाला.
"किती चांगले झाले नाही आम्ही चालत चालत स्वर्गात येऊन पोहोचलो, आम्हाला खूप तहान लागलीय हो." तो प्रवाशी म्हणाला.
"इथलं पाणी खूप छान आहे, तुम्ही पाहिजे तितकं पाणी पिवू शकता." पहारेकरी म्हणाला. "माझा घोडा आणि कुत्रा पण खूप तहानलेले आहेत." प्रवाशी म्हणाला.
त्या प्रवाशाने पहारेकरी दादाला धन्यवाद दिले आणि ते तिघेही पुन्हा मार्गस्थ झाले. आणखी खूप चालल्यावर ते एका बगीच्याजवळ पोहोचले. त्याचा प्रवेश दरवाजा खूपच जीर्ण होता आणि आत जाण्याचा मार्ग पण भरपूर धुळीने माखलेला होता. आत पोहोचल्यावर त्यानं पाहिलं कि एका झाडाच्या सावलीत एक माणूस डोक्याला टोपी घालून झोपलेला होता.
"माफ करा पण इथे जनावरांना पाणी प्यायला मनाई आहे." पहारेकरी म्हणाला.
हे ऐकून प्रवाशी निराश झाला, त्याला खूप तहान लागली होती पण त्याला एकट्याला पाणी प्यायचे नव्हते, त्याचे जोडीदार पण तहानलेले होते ना.
"नमस्कार दादा," तो प्रवाशी त्या माणसाला म्हणाला,"मी माझा कुत्रा आणि घोडा खूप तहानलेले आहोत , थोडं पाणी मिळेल का दादा?"
"हा स्वर्ग आहे." तो माणूस म्हणाला.
तो माणूस त्या प्रवाशाला एका दिशेला बोट करत म्हणाला," तिकडे तो खडकाळ भाग दिसतोय न तुम्हाला , त्याच्या मधोमध एक पाण्याचा झरा आहे. जा हवं तेवढं पाणी प्या अगदी तृप्ती होईपर्यंत."
ते तिघेही जण त्या ठिकाणी पोहोचले आणि तिघांनीही मनसोक्त पाणी पिऊन आपली तहान भागवली. नंतर तो प्रवाशी त्या माणसाजवळ आला आणि म्हणाला,"खूप खूप धन्यवाद दादा, छान पाणी होतं , अगदी तृप्त झालो आम्ही पाणी पिऊन."
"पण हि कोणती जागा आहे दादा,"
तो माणूस हसत हसत म्हणाला,"नाराज होऊ नका दादा, त्या संगमरवरी स्वर्ग वाल्यांचा आमच्यावर खूप उपकार आहे, त्या ठिकाणी असे सर्व लोक थांबतात जे स्वार्थी असतात. स्वत: साठी ते आपल्या जवळच्यांना ,मित्रांना सुद्धा सोडू शकतात."
"स्वर्ग? पण याच मार्गावर आम्हाला पाठीमागे एक संगमरवरी ठिकाण भेटलं. आणि तिथला रखवालदार पण म्हणाला कि हा "स्वर्ग" आहे म्हणून.
"नाही...नाही... तो स्वर्ग नाही तो नरक आहे."
प्रवासी गोंधळला, संभ्रम अवस्थेत तो म्हणाला ,"कृपा करून मला असं कोड्यात टाकू नका , हा नक्की काय प्रकार आहे , मला तर काहीच कळेनासे झाले आहे."
(ही कथा पौउलो कोएलो यांच्या "The Devil and Miss Pyrm" या पुस्तकातील कथेवर आधारित)
© प्रमोद जोशी