Sunday 7 January 2018

देव

देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन विचारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात. देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मतआहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे.
 देव सर्वव्यापी आहे आणि तो सगळ्यात आहे.आणि तो कोणत्याही माध्यमातून, रूपातून अभिव्यक्त होऊ शकतो, प्रकट होऊ शकतो ही भावना ज्या प्रमाणे असंख्य लोकांच्या मनात आहे  
त्याच प्रमाणे मी देव मानत नाही , माझी मेहनत , माझे कष्ट यांवर माझा विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही असे मानणारे सुद्धा अनेक आहेत.आपल्याकडे आस्तिक हे संख्येने खूपच जास्त आहेत. नास्तिकपणा हा केवळ एक भूमिका म्हणून स्वीकारलेली भावना नसते तर देव असण्याची विचारधारा त्यांना पटत नसते म्हणूनच ती स्वीकारलेली असते. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोट्या पडद्यावर अवतरली आहे.


श्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या देवाची गोष्ट देवा शप्पथ या मालिकेतून गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पहायला मिळते आहे.  ही मालिका झी युवा मार्फत प्रसारित केली जात आहे. 
या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिश च्या भूमिकेत क्षितिश दाते आहे तर त्याच बरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोकच्या भूमिकेत संकर्षण कऱ्हाडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे , शाल्मली टोळ्ये , अभिषेक कुलकर्णी , कौमुदी वालोकर चैत्राली गुप्ते , आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत .
झी युवा ही अगदी अल्पावधीत लोकप्रिय झालेली मराठी वाहिनी आहे. झी युवा ही वाहिनी एक वेगळं आणि फ्रेश कन्टेन्ट देण्यासाठी आजच्या प्रेक्षकांमध्ये ओळखली जातेय. देवाशप्पथ ही एक पूर्णपणे वेगळीसंकल्पना असून या मालिकेतून देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत, पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवत आहेत. त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळत आहे.

बघू या पुढे काय काय घडते ते.

(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

© प्रमोद जोशी