Friday, 22 December 2017

कठीण समय येता....

        या जगात क्वचितच असा एखादा माणूस सापडेल की ज्याला जीवनामध्ये कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागलेले नाही. जोपर्यंत जगणे सुरु आहे तोपर्यंत सुख आणि दु:ख हि खिलारी जोडी आपल्याला साथ देत असते. पण एक आहे की कोणत्याही प्रसंगातून गेल्यावर आपणाला काही तरी शिकायला मिळतं; मग तो प्रसंग आनंदी असू दे किंवा क्लेशदायी. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रसंग त्या व्यक्तीला, त्याच्या आप्तस्वकीयांना काही तरी शिकवून जातो. इतिहास साक्षीदार आहे की ज्या व्यक्ती अशा कठीण प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्या आहेत त्यांनाच पुढे यश मिळालेले आहे. एवढंच नव्हे तर सातत्त्याने यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. जो माणूस अशा कठीण प्रसंगात सुद्धा न खचता धैर्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तोच पुढे एखादया आयडॉल पुरस्काराने सन्मानित होतो.

     खरं तर कठीण प्रसंगातून जाताना मी काय,तुम्ही काय , आपण सगळेच विचलित होतो . आता काय ? हा प्रश्न आपल्यापुढे असतो. पण आपल्याला तर प्रसंगाशी दोन हात करून त्याला तोंड द्यायचं असतं. न डगमगता आपणाला अशा प्रसंगाशी लढायला शिकायचं असतं. पण बऱ्याच वेळा आपलं अवसान गळून जातं. प्रसंगी नैराश्य, हताशपणा येतो.

      स्वामी विवेकानंद म्हणतात, अशा कठीण काळात जर तुमचा खरा मदत करणारा कुणी असेल तर ते तुम्ही स्वतः असता. तुम्ही स्वतःच तुमचे खरे मदतगार असता. 

जेव्हा केव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून, अडचणीतून जात असाल तेव्हा तुम्ही क्षणभर विसरून जा की तुम्ही अडचणीत सापडले आहात. तुम्ही तुमची हि अडचण तुमच्या जवळच्या कोणत्या तरी प्रिय व्यक्तीची आहे असं समजा. आणि शांत व थंड डोक्याने तुम्ही विचार करा की आपल्या या प्रिय व्यक्तीला यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय मार्ग काढाल, त्या व्यक्तीला तुम्ही काय सल्ला दयाल. मग बघा तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला संकट मुक्त करण्याचा एखादा तरी कवडसा मिळतो की नाही. 

    आणि एकदा कवडसा मिळाला की काय अवघड आहे प्रकाश शोधणं. आणि खात्री बाळगा की तुम्हाला हा प्रकाशरूपी आशेचा किरण सगळं काही व्यवस्थित करण्यास मदतच करतो.

बऱ्याच लोकांना अशा कठीण प्रसंगात मनातल्या मनात कुढण्याची , स्वतःला दोषी ठरवून त्रास  करून घ्यायची सवय असते. माझ्याच बाबतीत असं का होतं, देवाला दुसरं कोणी सापडत नाही का, का माझ्याच मागे तो हात धुवून लागलाय असं म्हणून स्वतः बरोबरच दुसऱ्याला पण मानसिक त्रास देण्याची सवय असते.  जवळ जवळ प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्यावर जे संकट आले आहे ते फार मोठे आहे, आजपर्यंत कुणावरही असे संकट आले नसेल. हे असं का वाटतं कारण आपण इतर जणांना पण काही समस्या आहेत का याचा कधीही विचार केलेला नसतो. आणि त्यामुळेच आपल्याला वाटतं की आपल्यावरच पहाड कोसळला आहे. खरं तर आपल्यापैकी आपल्या एखादया सहकाऱ्याला याहीपेक्षा मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलेले असतं. त्यानेही खंबीरपणे तोंड देत स्वतःला यातून बाहेर काढण्याचं बळ तुमच्या सारखच मिळवलेलं असतं. पण फक्त आपल्याला आणि आपल्यालाच असं वाटते की मी म्हणूनच यातून बाहेर पडलो , दुसरं कोणी असत तर केव्हाच त्याचं "अटॅक फटॅक सटॅक " झालं  असतं, म्हणजे तो या कठीण प्रसंगाचा बळी ठरला असता.. 

       खरं तर ईश्वरान प्रत्येकाला मन दिलंय, विचार करण्याची शक्ती दिलीय पण शेवटी हा मनुष्य स्वभाव आहे.  आणि तो बदलता येतो. पण बदलणे हा आपला स्थायीभाव असला पाहिजे. 

जगातले जवळ जवळ सर्व तत्ववेत्ते सांगून गेलेत की, जर तुमचं मन नकारात्मक विचार करत असेल तर नकारात्मक उर्जा  लहरी तयार होतील आणि जे चांगल घडणार आहे त्यामध्ये पण कदाचित अनेक अडचणी येऊ शकतील, पण तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल तर सकारात्मक उर्जा लहरी उत्पन्न होतील आणि जे अनुचित घडणार आहे ते सुद्धा कदाचित ते सुद्धा हि सकारात्मक उर्जा टाळू शकेल. लक्षात ठेवा,कठीण समय येता आपणच आपल्या कामास येतो.

So, be Positive. 




© प्रमोद जोशी