Tuesday 31 October 2017

चला पंढरीसी जाऊ

        काय असेल पंढरपूरचे वैशिष्ठ्य, जिथे लाखो लोक दर वर्षी पायी येतात, जी 'वारी' या नावाने प्रसिद्ध आहे? 
पंढरपूर हे असे स्थान आहे, जिथे परमेश्वर स्वत: आपल्या पत्नीसमवेत सगुण रुपात आहेत! 

          पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो,पत्नी व आई वडिल सत्यवती आणि जानुदेव यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात रहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले,तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत, घोड्यावर ते आई-वडिल ज्या समूहा बरोबरजात होते, तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो 'कुक्कुटस्वामीं' चा होता. तेथे त्या सर्वानी एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला.

         त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रीया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला,पाणी आणून, स्वामिंचे कपडे धुतले. आणि त्या बाहेरआल्या  व पुंडलिका जवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोणआहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ. "आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूक दिल्याने, महापापी आहेस." असे त्या म्हणाल्या.

         यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला, व तो त्यांचा आदर राखू लागला.तेव्हा त्याने आई-वडिलांना विनंती केली, की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे.

         एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना,  त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले.

      शेवटी ते भीमा (किंवा चंद्रभागा) नदीतिरा जवळआले. सोबत असलेल्या गोपाळांना 'गोपाळपूर' येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले.

     पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्यासेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलां विषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात! 

विठ्ठल म्हणजे असा जो विटेवर उभा आहे.                               ( विठ्ठल  -  विट + ठल (उभा ठाकणे) )

तर असा हा पंढरीचा महिमा कळल्यानंतर कुणीही म्हणेल चला पंढरीसी जाऊ....विठुरायाचे दर्शन घेऊ



© प्रमोद जोशी



Monday 30 October 2017

पंढरीचा परब्रह्म

पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. 
      विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.
          संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. 
        श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
 पुराणातील श्लोकाप्रमाणे 
                  वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ | 
                  ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
अर्थ- 
वि- विधाता- ब्रम्हदेव 
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत. 
पांडुरंग साक्षात विठू माऊली काय वर्णन करावे त्या मूर्तीचे.....
         दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. 

विठुरायाच्या मूर्तीकडे पहाताच भान हरपते व आपोआप मुखातून शब्द बाहेर पडतात,

||जय जय राम कृष्ण हरी||    
||जय जय राम कृष्ण हरी|| 




© प्रमोद जोशी


Thursday 26 October 2017

आत्मविश्वास

        जाणकार असं म्हणतात कि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्याच मनाचा पक्का निर्धार असतो. ज्याचा आत्मविश्वास दृढ आहे,पक्का आहे त्याचा कोणत्याही क्षेत्रात विजय होतोच होतो, नव्हे विजयश्री त्याच्यासाठी माळ घेऊन उभीच असते. डॉक्टर आंबेडकर यांनी सुद्धा म्हंटले आहे कि आत्मविश्वासा सारखी जगात दुसरी कोणतीही शक्ती नाही.

  ज्याच्याकडे दृढ आत्मविश्वास आहे त्याला अशक्यप्राय गोष्टीही सहज साध्य होतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर एडिसन या शास्त्रज्ञाचे घेता येईल. त्यांनी जे काही शोध लावले, शोध लावताना, प्रयोग करताना कित्येक वेळी त्यांना अपयश आले असेल,परंतु अपयश येऊन देखील तोच प्रयोग पुन्हा पुन्हा आत्मविश्वासाने होण्यासाठी करायचे. आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच ते नाव नवीन शोध लावू शकले. तर सांगण्याचा भाग एवढाच कि आज जर संशोधकांनी आत्मविश्वासाने काम केलेच नसते तर आज वेगवेगळे शोध लागलेच नसते. आज त्यांच्याच आत्मविश्वासाने केलेल्या निरनिराळ्या शोधानीच आज आपला पावलोपावली विजय होत आहे.

यशस्वी जीवनासाठी आत्मविश्‍वास एक खूप महत्त्वाचा गुण आहे. यश शिखर सर करणा-या बहुतेकांमध्‍ये हा गुण आढळतो. मग ते आमिर खान, सचिन तेंडूलकर, डॉ अब्दुल कलाम , धीरूभाई अंबानी  अशा अनेक यशस्वी व्यक्तिंचे उदाहरण देत येईल. आत्मविश्‍वास एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतो.

   जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास self confidence हीच त्याची चावी आहे. जे काही करायचे आहे ते आपल्यातील हा key point कसा वाढीस लागेल यासाठी. 

so, be posstive and confident!!!




© प्रमोद जोशी

Friday 20 October 2017

अंतरंगातील दिवाळी

दिवाळी सण मोठा असतो आणि या सणात आनंदाला तोटा नसतो हे अगदी बालवाडी पासून आपल्या मनावर ठसलेलं असतं. खरं तर हा आनंद वाढतो तो दिव्यांच्या लखलखीत प्रकाशामुळे. जेव्हा पणतीतल्या ज्योती उजळतात, तेव्हा सगळं फिकं पडतं. काय जादू असते ना या ज्योतिमध्ये! संध्याकाळी दिवा लावल्यावर देव्हाऱ्यातील मूर्ती सुद्धा किती उजळून जातात व एकदम चैतन्यमय वाटू लागतात.

    अंधारातील भयाची छाया देखील या ज्योतीच्या प्रकाशा मूळे दूर होते. एवढीशी ज्योत पण माणसाच्या मनातील हुरहूर दूर करते. माणसाचं मन उजळवून टाकते.

उजळलेल्या या ज्योती पहिल्या की मनात विचार येतो की , कधी अज्ञान दूर करणारी तर कधी निराशा दूर करणारी ज्योत आपल्यालाही होता आलं तर. समाजात अशी भरीव कार्य करून यशाचे लख्ख उजेड पाडणारी व्यक्तिमत्वे आहेत. आपल्याला पण खारीचा वाटा उचलता आला तर!

    दिवाळीच्या निमित्तानं जागोजागी पणत्या लावल्या जात होत्या, प्रत्येक व्यक्ती एक एक पणती घेऊन उभा होता, एक एक करून प्रत्येकाला पणती लावायला सांगितली जात होती, अतिशय प्रसन्नतेने प्रत्येक जण पणती लावत होता, थोड्याच वेळात आसपासचा परिसर प्रकाशाने लख्ख उजळून गेला,
    शेकडो ज्योती प्रकाशमान झाल्या होत्या. त्या ज्योती तर तेजस्वी होत्याच पण त्या उजळवणारी मंडळीही तेजस्वी भासत होती, किंबहुना त्या सगळ्यांच्या अंतरंगात एक तेजस्विनी प्रकाशली होती.
    प्रत्येक माणूस म्हणजे एक ज्योत, किती छान कल्पना, हे जे काही या क्षणी भासले ते प्रत्यक्षात घडलं तर...
तर प्रत्येकाच्या अंतरंगात रोजच दिवाळी असेल .....


© प्रमोद जोशी 

चैतन्याची उधळण


        नुकतीच थंडी सुरु झालेली असते, दिवाळीचं आगमन होतं आणि त्यात दिव्याची उब घरादारात रेंगाळते.
सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हजारो दिवे लावून दिवाळीचे जल्लोषात स्वागत होते.  पणत्यांबरोबरच आकाशदिवे लावून दिवाळीच स्वागत केल जात. बाजारात अनेक आकाराचे आकाशदिवे मिळत असले तरी घरी आकाशकंदील स्वतः करण्याची मजा काही वेगळीच.....शिवाय कल्पना शक्तीला आणि कलाकौशल्याला वाव...

     दिवाळीच आणि रांगोळीच नात अगदी जुनंच बरका! दिवाळीच्या निम्मिताने घरासमोर, देवळात, आणि सार्वजनिक जागी लहान, मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेरची रांगोळी हे संस्काराच प्रतिक मानल जात, रांगोळीतले रंग घरातील सुख समृद्धीची जाणीव करून देतात.

   दारात काढलेली रांगोळी ही मला तर पहिल्यापासूनच म्हणजे मला कळायला लागल्यापासून नेहमीच 'ग्रेट' काहीशी 'हटके' अशीच वाटत आली आहे.  मला नेहमी असं वाटतं की ही रांगोळी आपल्याला काहीतरी सांगतेय, जणू काही ती सुखाचं प्रतीक आहे आणि आपल्याला मूकपणे सांगतेय 'मी सुखात आहे, तुम्हाला पण सुख मिळो'. व्वा, क्या बात है, आजकाल या धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात वेळ कुणाकडे आहे आपणास मिळालेल्या वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला? मला वाटतं रांगोळी हा सर्वात उत्तम मार्ग असावा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा व इतरांना शुभेच्छा देण्याचा, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा. 'सर्व काही मंगलमय होवो, सर्वांचे कल्याण होवो' हेच ती रांगोळी प्रत्येक ठिपक्यातून सूचित करत असणार.

    बाजारात कितीही छान छान भेटकार्ड मिळत असली तरी आप्तेष्ट, नातलगाना देण्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेल्या अश्या शुभेच्छा पत्रकात काही वेगळच प्रेम असत, ते शब्दात नाही सांगता येणार. आजच्या मोबाईल संस्कृती मध्ये हे सगळं हरवत चाललंय.
 



© प्रमोद जोशी

Tuesday 17 October 2017

सुरेल मैफिलीची दिवाळी पहाट

दिवाळी तीच आहे. साजरी करणारी माणसे म्हणजे पिढी फक्त बदलते आहे. पिढी नुसार साजरी करण्याचे तंत्र बदलत चालले आहे. गत काही वर्षात तरुणांमध्ये संगीत, गायन-वादन शिकण्याचे वेड वाढले असून, त्याचाच हा परिपाक आहे की, दिवाळी पहाट ही संगीतिक सप्तसुरांनी रंगतदार ठरते आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल करण्याकरिता लोकनेत्यांपासून अनेक सामाजिक संस्था, उद्योजक, सेलिब्रेटीही पुढाकार घेत आहेत. मुंबईसह बहुतांश सर्व शहरांतून विविध गायकांच्या गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत दिवाळीची सुरुवात होते. सुरूवातीच्या काळात फॅड म्हणून हिणवली गेलेली दिवाळी पहाटेच्या संगीत मैफलींची परंपरा आता चांगलीच मूळ धरू लागली आहे. किंबहुना तिने चांगलाच तग धरला आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ‘चतुरंग’ संस्थेने सुरूवातीला मुंबईत दिवाळीच्या पहाटे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ नाटकाचा प्रयोग केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीच्या सकाळीही रसिक कार्यक्रमासाठी घराबाहेर पडू शकतात, हे या प्रयोगास मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आढळून आले. ‘चतुरंग’ने अशा रितीने दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याचा मार्गच जणू  रसिकजनांना दाखवून दिला. दिवाळी हा तसा कौटुंबिक, आप्तस्वकियांसोबत साजरा केला जाणारा सण. पहाट मैफलींनी दिवाळीला सार्वजनिक अधिष्ठान दिले. एक आगळी वेगळी प्रतिष्ठा मिळवून द्यायचा प्रयत्न केला. या मैफलिनी रसिकांना एकत्र करून दिवाळीचा उत्साह संगीताच्या, गाण्याच्या संगतीत एकमेकांना वाटण्याची संधी दिली. एरवी नरक चर्तुदशीच्या पहाटे रेडिओवर लागणारे नरकासुराचा वध हे कीर्तन ऐकत अभ्यंगस्नान, आधी देवपूजा आणि मग अर्थात पोटपुजा.. हे दिवाळीचे घराघरातील पारंपरिक वेळापत्रक पहाटेच्या संगीत मैफलींनी बदलले.आता पहाटे चारला उठून, अभ्यंगस्नानासह सर्व अन्हिके उरकून सहा-साडेसहाला रसिक गाण्याच्या मैफलीला सभागृहात जागा अडवितात. मुंबई परिसरात सुरू झालेली दिवाळी पहाट संगीत मैफलींची परंपरा आता महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठय़ा शहर, उपनगरांमधून रूजू लागली आहे. अनेक नामवंत आणि दिग्गज गायकांबरोबरच नवोदित कलावंतही दिवाळीच्या दिवसात उपलब्ध झालेल्या या नव्या व्यासपीठावर आपली कला सादर करतात. शास्त्रीय-उपशास्त्रीय, सुगम संगीत, चित्रपटसंगीत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम दिवाळीच्या काळात होतात. पहाटेच्या या मैफिलींमध्ये गाण्याबरोबरच रुचीपालट म्हणून खमंग गप्पा, सुसंवाद यांचाही बेत आखला जातो. पूर्वी ऑस्केस्ट्रामध्ये मिमिक्री असायची, तशा या गप्पा. व्यावसायिक नाटक, दूरचित्रवाणी मालिका अथवा सिनेसृष्टीतील अभिनेता-अभिनेत्री या गप्पाष्टकात सहभागी होतात. एवढय़ा भल्या पहाटे गाणं ऐकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रसिकांच्या हाती चहाफराळ देण्याची कल्पकताही काही आयोजक दाखवितात.
आणि मग अस म्हणावसं वाटतं...

कसा करावा उत्सव
मैफिल सांगून गेली
रसिकांची मने उत्सवात
शतशः रंगून गेली...


© प्रमोद जोशी

उत्साहमयी दीपोत्सव

दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनातील सर्वाधिक मोठा व आनंदाचा असून प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचं स्नेहपूर्वक संवर्धन करतो. दिवाळी....किती आनंद. केवळ कुटुंबातच नाही. सा-या धरणीवर. जिथे नजर जाते तिथे. कोपरान् कोपरा उजळलेला. मनाला आनंद देणारी तरी बोचणारी थंडी. उबदार हवा. सूर्यांची किरणे हवीहवीशी वाटणारी. तरीही दुपारी थोडी तापविणारी. शरीरावर नाजूकपणे पसरणारी. पावसाळ्यात ओल्या झालेल्या मातीला थंडावा देणारी. शेतीत लावलेल्या बीजाला अंकूर फुटविणारी.
 
दिपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव असतो... नात्यांचा सण ! दिवाळीच औचित्य साधून घरादारात, रस्त्यांवर, उद्यानात, पारंपारिक वास्तुत, सार्वजनिक स्थळांमध्ये हजारो दिवे लावून दिपोस्तव साजरा केला जातो. नात्यातला ओलावा टिकून राहण्यासाठी दिवाळी एक हक्काचा उत्सव.

दिवाळी म्हणजे चैतन्य,
दिवाळी म्हणजे उत्साह,
दिवाळी म्हणजे धमाल,
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे रोशनाई,
दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या भेटीगाठी
दिवाळी म्हणजे भेटवस्तू, मिठायांची देवाणघेवाण,
दिवाळी म्हणजे शुभेच्छापत्र, रांगोळ्या अन अभ्यंगस्नान

दिवाळीचा महोत्सव खरच काही खास असतो, नेत्रदीपक चैतन्यदायी असे वातावरण असत,  ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान येणारा हा उस्तव सात दिवसांचा...पण त्यातले चार दिवस अधिक जल्लोषात साजरे केले जातात, प्रत्येक दिवसाच आगळ वेगळ महत्व.
    अश्विन कृ. एकादशी म्हणजेच रमा एकादशीला पहिला दिवा लावण्याची अगदी जुनी प्रथा,
दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा म्हणजेच वासुबारसेचा, ह्या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, सवाष्णी गोमातेला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात, मग गोमातेला वंदन करून पुढील सुखकर आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले जातात. गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव सामावले असल्याची श्रद्धा असल्याने गोमातेला केलेले वंदन थेट तेहतीस कोटी देवांपाशी पोहोचते असे मानतात.
त्या नंतर येते ती धनत्रयोदशी , ह्यादिवशी देवांचे वैद्य 'धन्वंतरी' ह्यांची पूजा होते. ह्यादिवाशीच यमदीपदान असते. यमासाठी कणकेचा दिवा लावला जातो. यमाची दिशा 'दक्षिण' म्हणून हा दिवा दक्षिणेला ज्योत येईल अश्या पद्धतीने ठेवला जातो.
                 दुसऱ्या दिवशी येते ती नरकचर्तुदशी, हीच दिवाळी पहाट! अशी दंत कथा आहे की ह्या दिवशी जो सूर्योदयानंतर उठेल किंवा स्नान करेल तो नरकात जाईल. वास्तविक स्वर्ग, नरक ह्या सर्व कल्पना माणसाच्याच पण काही का असेना दिवाळीच्या पहाटे पहाटे उठून आईकडून सुगंधित तेल, उटन लावून घ्यायच आणि मग कढत्या पाण्याने स्नान! वाह !!!! दिवालीका मजाही कुछ और है! दिवाळी पहाटे  नवीन नवीन कपडे घालून घर पणत्यांनी भरून टाकायचं.. त्यानंतरच  देवदर्शन, कुटुंबासमवेत यथेच्छ फराळ, गप्पा टप्पा जवाब नही!
              नंतरच्या दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन, लक्ष्मी घरी नांदावी म्हणून तिची पूजा केली जाते.
             त्यानंतरचा दिवस म्हणजे कार्तिक शु. प्रतिपदा, बलिप्रतिपदा किंवा  पाडवा नवीन जोडप्यातील नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी आणि जुन्यांमधला आहे तसाच टिकवण्यासाठीचा खास दिवस! ह्यादिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. दुकानदारांसाठी हा वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यांच्या जमाखर्चाच्या वहीची पूजा आदल्या दिवशी केली जाते. बळी राजा ह्याच दिवशी दैत्यांवर विजय मिळवून परतला होता त्यामुळे ह्या दिवशी बळी राजाचेही स्मरण केले जाते.
             त्या नंतर येते यमद्वितीया किंवा भाऊबीज , भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्या कडून ओवाळून घेतो, अस म्हणतात ह्या दिवशी यमही त्याच्या बहिणीकडे यमिकडे जाऊन ओवाळून घेतो.
ह्या चारही दिवसातले खरे सार, आणि आकर्षणाचा विषय म्हणजे दिवे... पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लावून जमीन, आकाश उजळवून टाकले जाते.
एकूणच हा दीपोत्सव आनंदाचा, प्रसन्नतेचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा घेऊनच येत असतो. काळानुसार बदल होत गेला त्यामध्ये. आता चाळीतली दिवाळी जरी सर्वत्र पहायला मिळत नसली तरी तिची आठवण मात्र येत राहते किंबहुना ती मुद्दाम करून दिली जाते नव्या पिढीसाठी उठा उठा दिवाळी आली .... असं म्हणत म्हणत.

दिवाळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

Wednesday 11 October 2017

सात अक्षरी जादुई स्वप्न

अमिताभ बच्चन...! सात जादुई अक्षरं आणि दोन भारदस्त शब्द. अमिताभ म्हणजे सूर्य. हिंदी चित्रपटसृष्टीच्या क्षितिजावर उगवलेला. रूपेरी पडद्यावरील आपल्या तेजोमय अस्तित्वानं थिएटरमधल्या अंधारात तुमच्या-आमच्या भोवतीचं अप्रकाशित वलय प्रकाशमान करणारा. तुमचा-आमचा आवडता अमिताभ बच्चन...! अमिताभ बच्चन हे खरं तर केवळ दोन शब्द किंवा सात अक्षरं नाहीत. ते एक संपूर्ण वाक्य आहे. अभिनेता, स्टार, संवेदनशील व्यक्ती, सुसंस्कृत माणूस अशा कोणत्याही संज्ञेची ती दोन शब्दांतील व्याख्या आहे. का आवडतो अमिताभ इतका? कारण पडदा व्यापून राहणारं त्याचं अस्तित्व प्रेक्षक म्हणून आपल्याला दिलासा देतं आणि जगण्याच्या संघर्षात सर्वसामान्यांना कायमच येणारी आगतिकता आभासी जगात का होईना, विजयात परिवर्तित होते. 

अमिताभ आला, त्या काळात राजेश खन्नापासून धर्मेंद्रपर्यंत आणि जितेंद्रपासून शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, शशी कपूर किंवा विनोद खन्नापर्यंत ‘हीरो’ मटेरियल असलेले अनेक जण होतेच की! देव आनंदही अजून कार्यरत होता; पण या सगळ्यांचं पडद्यावरचं किंवा बाहेरचं अस्तित्वही ‘चार्मिंग’ या सदरात मोडणारं होतं. अमिताभ मात्र हा असा एक चेहरा होता, ज्याला सामान्य माणसानं ‘रिलेट’ केलं. 

सत्तरच्या दशकापासून सुरू झालेला अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’चा प्रवास नव्वदच्या ‘अग्निपथ’, ‘हम’पर्यंत कायम राहिला. खरं तर ‘जंजीर’च्या आधी अमिताभनं केलेले अकरा-बारा सिनेमे हे त्याच्या नंतर तयार झालेल्या प्रतिमेशी पूर्ण विसंगतच आहेत. ‘सात हिंदुस्तानी’पासून सुरू झालेला त्याचा प्रवास अपयशाचाच होता. ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’मध्ये दखल घेतली गेली, तरी ते सिनेमे त्याच्यापेक्षा जास्त राजेश खन्नाचेच होते. एक वेळ तर अशी होती, की अमिताभ बाडबिस्तरा गुंडाळून मुंबई सोडून जायचा विचार करत होता. कोलकात्यातली सुखाची नोकरी सोडून मुंबईत आला, तोच मुळी आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन! आपल्याला अभिनयच करायचा आहे, असं आतून वाटल्यानंतर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी रूढार्थानं ‘सेटल’ झालेल्या आयुष्यापासून फारकत घेऊन नव्या स्वप्नामागे धावणं हे काही सोपं नाही. अमिताभनं ते केलं. फ्लॉप झालेल्या सलग ११ सिनेमांचं अपयश त्यानं पचवलं आणि तो टिकून राहिला. ‘अँग्री यंग मॅन’ची इतकी स्ट्राँग प्रतिमा निर्माण होण्यामध्ये सलीम-जावेद यांच्या लेखनाचा जितका वाटा आहे, तितकाच कदाचित त्याच्या या स्ट्रगलचाही आहे. त्याच्या डोळ्यांतला अंगार, भारदस्त शरीरयष्टी नसली, तरी देहबोलीत असलेला आत्मविश्वास आणि आवाजातलं ‘कन्व्हिक्शन’ या गोष्टी पराभवालाही पराभूत करणाऱ्या वाटतात, त्या त्यामुळेच. 

सभोवतालची परिस्थिती ‘गब्बरसिंग’ किंवा ‘प्रेम चोप्रा’सारखी अंगावर येते, तेव्हा त्याला सामोरं जाण्यासाठी ‘विजय’च लागतो. समकालीन इतर हीरोंच्या सिनेमांत ‘रोमान्स’च्या दरम्यान केवळ औपचारिकता म्हणून हाणामारीची दृश्यं येत असताना, अमिताभचे चित्रपट मात्र संघर्षाच्या कथाबीजांवरच उभे राहिले. ‘जंजीर’मध्ये पोलिस स्टेशनमध्ये आलेला गुंड खुर्चीत बसण्यापूर्वीच त्याची खुर्ची लाथेनं उडवणारा आणि ‘जब तक बैठने को कहाँ न जाये, खडे रहो’ असं बोलणारा पोलिस अधिकारी पब्लिकला त्या वेळी हवा होता. अमिताभच्या रूपानं पडद्यावर का होईना, त्यांचं हे स्वप्न साकार झालं. इतका लंबू हीरो त्यापूर्वी पब्लिकनं कधी पाहिला नव्हता, असा बुलंद आवाज ऐकला नव्हता, डोळ्यांच्या असल्या भाषेशी प्रेक्षकांची याआधी कधी ओळख नव्हती आणि स्वप्नं विकणाऱ्या जादूगाराशी अशी सलगी त्यांनी कधी केली नव्हती. पडद्यावरच्या नायकाशी रिलेट होणं, ही नवीनच गोष्ट प्रेक्षक करू लागले. अस्सलपणाला ‘कमर्शियल व्हॅल्यू’ देणारी ती खास अमिताभी अदाकारी होती. 

नव्वदच्या दशकामध्ये आपल्यातलं हीरोपण संपलंय आणि ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेची गरजही, याचंही नेमकं भान अमिताभला होतं. नव्वदच्या दशकामध्ये आपल्यातलं हीरोपण संपलंय आणि ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेची गरजही, याचंही नेमकं भान अमिताभला होतं. म्हणूनच ‘कौन बनेगा करोडपती’पासून परवाच्या ‘पिंक’पर्यंतच्या त्याच्या भूमिका त्याच्यातल्या ‘सुलझा हुआ’ कलाकाराचीच साक्ष देतात; पण तरी आमच्यासारख्या निस्सीम चाहत्यांना थिएटरमधल्या अंधारात चाचपडायला झालं, की अजूनही आठवतो तो ‘दीवार’मधला डायलॉग. थेट गुंडांच्या साम्राज्यात जाऊन त्याला आव्हान देत तो म्हणतो, ‘तुम मुझे वहाँ ढूँढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था।’ आम्ही टाळ्या पिटतो, शिट्ट्या वाजवतो, आनंदतो आणि म्हणतो, ‘आया, अमिताभ आया'.


अजूनही आठवतात ते टाळ्या घेणारे ते बंदया रुपायासारखे खणखणीत डायलॉग,

जाओ, पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरे बाप को चोर कहा था. पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरी मां को गाली दे के नौकरी निकाल दिया था. पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरे हाथ पर ये लिख दिया था... ये... उसके बाद, उसके बाद मेरे भाई तुम जहां कहोगे, मैं साइन कर दूंगा

आई कैन टॉक इंग्लिश, आई कैन वॉक इंग्लिश, आई कैन लाफ इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज ए वेरी फनी लैंग्वेज.

हम जहाँ खडे होते हैं line वहीं से शुरु हो जाती हैं

75 व्या वाढदिवसाच्या आपल्या बिग बी ला मनापासून शुभेच्छा 

Thursday 5 October 2017

टप्पोरा चंद्र

काय आज काय आहे? कशाचं एवढं प्लॅनिंग चाललंय आं?
अरे बाबा आज कोजागिरी आहे
अलीकडे तू कॅलेंडर बघायचं सोडून दिलं आहेस बघ.
तुझं कश्यात लक्षच नाही हल्ली.
एका चुकीमुळे बऱ्याचदा असं ऐकून घ्यावं लागतं आपल्याला.
तर सांगायचं मुद्दा हा की आज कोजागिरी पौर्णिमा. आज चक्क फुल्ल मुन, टप्पोरा चंद्र पहायला मिळणार.
त्याच्या शीतल रजत किरणांनी आणि चांदण्यांनी सिद्ध केलेलं मस्त मसाले दूध, सोबत आवडीचं स्नॅक्स.
शायरी, गाणी यांनी गाजवली जाणारी रात्र आणि आपला आशीर्वाद देण्यासाठी को-जागरती म्हणजे अजून कोण कोण जागं आहे हे पहायला येणारी माँ लक्ष्मी.
चांदणं कुणाला आवडणार नाही, विशेषतः नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमीकाना, जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यांना,अगदी प्रेमाची नुकतीच चाहूल लागलेल्या सर्वाना.
लहानग्यांना चंद्रात चांदोबा किंवा चांदोमामा दिसतो.
पण कोणत्याही प्रेमीला किंवा पती पत्नीला अगदी ते आजोबा असले तरी आपल्या प्रिय चा चेहरा दिसतो तो याच टप्पोऱ्या चंद्रा मध्ये.
याच चंद्राला साक्षी ठेऊन प्रेमाची सरिता वाहते , तिला तिचा सागर मिळतो.
याच चंद्राला लहान मुलं मामा करतात तर प्रेमाची गणितं सोडवनारे त्याला आपली प्रिय मानतात.
एकूण मामला गंभीर आहे.
चंद्र म्हंटलं की जोडीला सूर्य पण येतो. पण दोघे पूर्णपणे विरुद्ध, एक शीतल तर एक उष्ण. आणि शीतल किंवा सौम्य गोष्टं कुणालाही आवडते, त्यामुळे पौर्णिमेचा चंद्रमा सुखकर वाटतो. जवळ असणाऱ्या किंवा नसणाऱ्या आपल्या प्रिय चं रूप त्याला चंद्रमा भासतं.
कदाचित त्यामुळंच लेखक व कवी मंडळींना सूर्या पेक्षा चंद्र भुलवतो आणि मग ओठावर सतत येणारी , गुणगुणली जाणारी काव्ये, गाणी, गझल , शायरी तयार होतात.
आणि मग एखादा शायर म्हणतो,
चंद्र आहे साक्षीला

कल रात चाँद बिलकुल
तेरे जैसा था
वो ही खूबसुरती, वो ही नूर,
वो ही गुरुर, और   वैसे ही....
तुम्हारी तरह दूर!


तर कुणी दुसरा म्हणतो,

वैसे चाँद तो दिन को कब निकलता हैं
वो तो रात को ही निकलता है

और बीच में अमावस तो आती हैं
वैसे तो वो पंद्रह दिन की होती है,

लेकीन इस बार बहुत लंबी है
लगता हैं अगले जनम तक

फुलपाखरांचे अंतरंग -२

विंदा आजोबा ,  अहो विंदा आजोबा
कुठे गेलेत हे सकाळी सकाळी, आज बाबा पण लवकर गेलेत ऑफिस ला, तिकडे अनिल दादा पण लवकर गेलाय असं मानस म्हणाला. खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि भरपुर काम दिसतंय एकंदरीत.
वैदेही अगं वैदू बाळा आवरलं का ग तुझं,
अहो विंदा आजोबा कुठे होतात तुम्ही, मी केव्हापासून शोधतेय तुम्हाला.
अगं बेटा आज कोजागिरी आणि दुधात साखर म्हणजे गुरुवार. दत्त दर्शन करून आलो. येतांना दूध व दुध मसाला पण घेऊन आलो. तुझे बाबा येईपर्यंत फक्कड दूध बनवीन. तुझ्या दादाला तर खूप आवडते मसाला दूध आणि बाबांना तर खूपच.
पण त्यांना जास्त देऊ नका बरं का विंदा आजोबा, त्यांना नंतर त्रास होईल. मला खूप काळजी वाटते त्यांची.
हं मुलांनी बाबाची काळजी करायची आणि बाबानी मुलांची. देवा काळजीच पीक तुझ्याकडे जास्त आहे का रे, म्हणून तू सगळ्यांना अगदी मोफत वाटत सुटला आहेस.
तुम्ही नं विंदा आजोबा खूप छान बोलता, असं वाटतं की तुम्ही बोलावं आणि मी ऐकत रहावं. कुठून मिळालं एवढे ज्ञान आणि संस्कार तुम्हाला. अगं एवढं मोठ्ठ आयुष्याचं विद्यापीठ आणि अनुभवरूपी गुरू सर्व काही शिकवून जातं बेटा.

विंदा आजोबा, एक विचारू.
अगं बेटा, एक काय दहा विचार, का गं काही अडचण आहे का, नाही म्हणजे माझ्या आवाक्यातली असेंल तर मार्ग काढू शकेन.
नाही नाही विंदा आजोबा मला कोजागिरी बद्दल फारसे काहीच माहीत नाही, म्हंटल तुमच्या कडून मिळवावी माहिती.
हात्तीच्या, एवढंच ना, सांगतो की माहिती, ऐक बेटा-

चांदणं अंगावर घेत रात्र जागवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी. भारतीय सण ऋतुमानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. प्रसन्न शरद ऋतूच्या आगमनात साजरा होणारा दिवस म्हणून कोजागरीची ओळख आहे. हा दिवस आश्‍विन प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणून तिला आश्‍विन पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आकाशात ढगाआड लपलेला चंद्र आपले दर्शन देतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो आणि चंद्राच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा मसालेदार दुधाचा आस्वाद घेत उत्साहात साजरी केली जाते.....

कोजागरीच्या रात्री देवी महालक्ष्मी ‘को जागर्ति’ असे विचारत प्रत्येक घराघरात डोकावते. कोण जागे आहेत ते पाहते. जे जागे आहेत त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. येथे नुसते ‘जागे राहणे’ हे अभिप्रेत नाही. जागे राहणे म्हणजे ‘न झोपणे नव्हे’ तर जागृती, सावधानता. कोजागरीच्या रूपाने प्रत्येक घरात डोकावणारी ही लक्ष्मी या जागृतीचे प्रतीक आहे. कोजागरी म्हणजे ‘जागृतीचा संदेश.’शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये यासाठी सुवासिक जल, थंड पेयं घ्यावीत, चंदप्रकाशात बसावं, मोत्याच्या माळा धारण कराव्या आणि चंदनादी शीतदव्यांचे लेप करावेत असं सांगितलं आहे.....

आपली कालगणनाच मुळी चंद्रकलांवर आधारलेली. चंद्राला सर्वोच्च मान मिळालाय तो आपल्या कालगणनेकडून. मराठी पंचांगात प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व आगळेवेगळे.... कोजागरी पौर्णिमा ही आपल्या प्रत्येक पूर्ववत पौर्णिमेकडून शौर्य, ज्ञान, सेवा, श्रद्धा, प्रेम इत्यादी गुण आत्मसात करून आपल्याला देते...!!! आश्‍विन पौर्णिमेला चंद्राची किरणे अतिशय शांत असतात. ती अंगावर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. आयुर्वेदातही त्याचे महत्त्व सांगितले आहे म्हणूनच या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे......

बाप रे, विंदा आजोबा किती छान समजावून सांगितलं तुम्ही, तुम्ही तर खरं म्हणजे प्राध्यापक व्हायला पाहिजे होतात. 
नाही ग, काहीतरीच काय, वाचन आणि अनुभवाची शाळा यातून जे मिळाले ते साठवून ठेवलं , बाकी काही नाही
तुम्ही न विंदा आजोबा चालतं बोलतं विद्यापीठ आहात.
वैदू बेटा, पुरे हं , उगाच या म्हाताऱ्या ला हरभऱ्याच्या झाडावर बसवू नकोस.
नाही हो , विंदा आजोबा, खरच तुम्ही ज्ञानी आहात.
बरं तू कॉलेज ला जाणार आहेस ना? मी पटकन नाश्ता गरम करतो. तुझा बाबा पण आज लवकर गेला ऑफिसात म्हणून लवकरच केला, सगळे खाऊन गेले म्हणजे बरं वाटतं.
वैदू बेटा, तुझा बाबा तुला काही बोलला का ग, नाही म्हणजे आजकाल तो जरा गप्प गप्प असतो, टेन्शन मध्ये दिसतो.
नाही काही बोलले बाबा, पण तुम्ही म्हणता ते मला पण जाणवतंय विंदा आजोबा.
आणि ऐक ना वैदू बेटा, मी ना आज दत्त गुरूंना प्रार्थना केली की, आमच्या वैदू बाळाचं म्हणजे बाबांच्या फुलपाखराचं सर्व काही चांगलं होऊ देत.
विंदा आजोबा , खरंच खूप खूप थँक्स, असे आजोबा सर्वाना मिळोत.

आणि मनातला मानस त्याचं काय?
आं आं, काय हो विंदा आजोबा,
अरेच्या लाजून पळाली वाटतं
पण पोर फार गोड आहे, मानस लेकाचा लकी आहे.

फुलपाखरांचे अंतरंग -१

नमस्कार वाचक इ मित्रहो,
सर्वप्रथम या ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत.

या ब्लॉगमधून चांगले लिहिण्याचा व देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.
माणसाला विचार करण्याची शक्ती देवानं दिली आहे, आणि त्यासाठो मन आणि मेंदू बहाल केला आहे.
हे मन इतके विचित्र आहे की ते नेहमी चिरतरुण च असतं. व्यक्ती वयानुसार बाकी सर्व शरीर थकत जातं, ते कुरकुर करू लागतं.  मनात नेहमी चांगले वाईट विचार येतात, ते सुखावते पण आणि दुखावते पण, दुःखी मन सुखावयाला काही वेळा खूप काळ जावा लागतो,  पण मनाला जर चांगली संगत आणि साथ  मिळाली तर व्यक्ती कुणीही कितीही वयाची असो मन हे फुलपाखरू बनून राहतं. ते बागडत रहातं. 
अशाच काही फुलपाखरु मनाचा, मनातील क्षणाचा, मनातील स्वगताचा प्रवाह आपणापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न "फुलपाखरांचे अंतरंग" या सदरामार्फत माझा राहील. मी आशावादी आहे, आपण नक्कीच याला चांगली दाद द्याल.

प्रमोद जोशी

*********************************************

हाय मानस,
कसा आहेस?
मी मस्त.
बरं मला सांग तू कशी आहेस वैदेही?
मी ना, मी सुध्दा मस्तच.

पण मगाशी तू फोन का उचलत नव्हतास मानस ?
अगं आज कोजागिरी आहे माहीत नाही का?
हो हो बाबा म्हणत होते सकाळी.
पण त्याचं काय. विषय बदलू नकोस. तू फोन का उचलला नाहीस ते सांग आधी.
अरे हो हो हो,  मला बोलून तर देशील.
अगं तेच तर सांगतोय ना , ऐक ना ,आज कोजागिरी ना मग काय बाबांनी सकाळी मी ब्रश केल्यानंतर मला लगेच बोलावलं आणि सांगितलं की आवरून लगेच ये, मला तुला एक काम सांगायचं आहे.
मग काय फोन सायलेंट वर ठेवला आणि आवरायला गेलो, तेवढ्यात तुझा फोन येऊन गेला, आणि मला मिस्ड कॉल्स बघायला वेळच मिळाला नाही, सॉरी.
एवढं कसलं काम होतं बाबांचं, की तुला इतकं बिझी राहावं लागलं.
त्याचं काय आहे ना वैदेही आम्ही सोसायटी मधले सर्व जण कोजागिरी ला धमाल करतो. पण त्याचं नियोजन आधी करावं लागतं. म्हणजे बघ ना , म्हणजे प्रत्येक घरातले किती जण सहभागी होणार, स्नॅक्स काय ठरवायचं ते किती मागवायचे , मसाला दूध किती लिटर हे सगळं ठरवून त्याचं बजेट ठरवायचं, सेक्रेटरी नि मंजुरी दिली की कामाला लागायचं. खरं तर हे सर्व अनिल दादा बघतो, पण यावर्षी तो जरा कामात आहे, जास्त वर्क लोड आहे म्हणत होता, ते प्रोजेक्ट विश्वास का काय ते, खूप गडबड आहे म्हणत होता. मग बाबा त्याला म्हणाले की, डोन्ट वरी मानस आहे ना , तर अनिल दादा पण ना, तिरका कटाक्ष टाकून म्हणतो कसा, काय सांगता आज मानस ला वेळ आहे, असेल असेल पण कसं आहे ना फक्त चंद्र उगवेपर्यंत. एकदा का चांद आला की कुठले स्नॅक्स आणि मसाला दूध, हो क्की नै रे मानस, गम्मत केली रे.. चिल अँड एन्जॉय, आणि गाणे गुणगुणत गेला कुठलं ते आपलं हे "चेहरा है या चांद खिला हैं"
बाबा मला म्हणाले, याला काय झालं रे एकदम, मी त्यांना म्हणालो काय माहित, अर्चना वहिनी ला विचारतो. ते माझ्यावरच ओरडले.. उगीच काहीतरी आचरट पणा करू नकोस. एक काम कर तू अनिल ने सांगितलंय तसं सगळं manage कर.
तर वैदेही ह्यात माझा वेळ गेला, जरा समजून घे ना प्लिज.
बरं मानस ऐक ना, तुझं काम तासात होईल का, माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे. मी तूला फोन करते मग कॉलेज वर भेटू. ओके बाय
बैस राधा, आई बाबांची आठवण येत नाही ना, कारण बरेच दिवस झाले त्यांना भेटून.
नाही बाबा खरं तर तुम्ही सगळे इतके चांगले आहात ना मला अजिबात मी दुसरीकडे आहे असं वाटत नाही.
बरं आज रात्री सोसायटी मध्ये कोजागिरी कार्यक्रम आहे तू पण यायचं आहेस.  का तुमचा काही वेगळा प्लॅन आहे, तुझा रे मानस?
आई शप्पथ बाबा, काय मनकवडे आहात हो तुम्ही ( अर्थात हे मनातल्या मनांत) , नाही तसं काही फिक्स नाही अजून.
अरे पण ते स्नॅक्स,दूध वाया जाईल ना तुमच्या वाटणीच.
नाही तसं काही होणार नाही आमची गोल्डन गॅंग असल्यावर कसली काळजी करता, समजा राहिलं तर आम्ही उद्या संपवू. हो की नै राधा?
हो हो नो प्रॉब्लेम.
बरं बाबा , माझं जरा काम आहे मी जाऊन येते तास दीड तासांमध्ये.
अगं राधा मानस निघालाच आहे तर त्याच्या बरोबरच जा ना, उगीच रिक्षा कशाला नाही का?
बरं चालेल
मानस , अरे जा लवकर, आणि राधाला पण ड्रॉप कर
हो बाबा,
हं चला राधा काकू
काय म्हणालास काय मानस?
नाही बाबा, राधाला चल म्हणालो
हं जावा जावा लवकर, नमनाला घडाभर तेल, कसं व्हायचं या मुलांचं, परमेश्वरा कठीण आहे रे बाबा

प्रमोद जोशी