Sunday 31 December 2017

नवं वर्ष,नवी दृष्टी

नवं वर्ष,नवी दृष्टी

नवीन वर्ष आणि सोमवार हे समीकरण एकदा जुळून आलं की मग आपला आनंद गगनात मावेनासा होतो.  कोणतंही नवीन चांगलं काम करायला मी  एक तारीख, सोमवार किंवा गुरुवार निवडतो. आणि समजा जर कॉम्बिनेशन आलंच तर मग काय दुधात साखरच.

आता आज मला नव्या उमेदीने काहीतरी सुरुवात करायचीय, कारण उद्या सोमवार पण आहे आणि एक जानेवारी पण. असं कॉम्बिनेशन दरवर्षी थोडंच येतं.

ह्या सोमवारी म्हणजे एक जानेवारीला दोन हजार अठरा या वर्षाचं स्वागत करताना एवढं नवं कोरं वर्ष त्या विधात्याने आपल्या झोळीत टाकल्या बद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानले पाहिजेत, नाही का?

   कारण त्याने अजून पर्यंत तरी श्वास दिलाय म्हणूनच मी हे करू शकतोय.

आज माझ्या मनात घर करून राहिलेल्या सगळ्या प्रेरणाहीन, नकारात्मक व भीतीदायक अशा सैतानाला मारून काहीतरी नवं करायचं आहे, मानसिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.  माझ्यावरची जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यास मला सज्ज व्हायचंय.

एकविसाव्या शतकातील या अठराव्या वर्षात पदार्पण करताना मी माझ्यात नक्कीच बदल घडवतोय, तयार होतोय येणारं आयुष्य झेलायला,अधिक मजबूत व ताकदवान होउन... स्वप्नं साकारायला, स्वप्नं बघायला आणि सदैव फ्रेश रहायला.

तुम्हाला सर्वाना नववर्षाच्या शुभेच्छा...
हॅपी न्यू इयर...
© प्रमोद जोशी

प्रिय २०१७

प्रिय २०१७,


सस्नेह नमस्कार,

       गेल्या एक जानेवारीला तू आलास. २०१६ ची नाळ जोडूनच आलास... त्याचीही काही अर्धवट कामं सोबत घेऊन अगदी फाईली बरोबर घेऊनच. 

      तू वेगाने मार्गक्रमण करीत राहिलास. आज अखेरचा दिवस - ३१ डिसेंम्बर. प्रत्येक वर्षाला अखेर असते आणि दिवसाला एक रात्र. दिवस, संध्याकाळ, रात्र मध्यरात्र असा धावत धावत तू इथपर्यंत पोहोचलास. आज तू साथ सोडून जाणार हे खरंच क्लेश दायक वाटतंय. 

       एखाद्याच सोडून जाणं हे किती वेदना देणारं, क्लेश देणारं, मनाचा कोलाज बिघडवून टाकणारं  असतं हे किती जणांनी  तुझ्या साक्षीनच अनुभवलं  आहे. त्यांच्या  सर्व आप्त स्वकीयांप्रमाणच तू सुद्धा त्यांच्या  वेदनांवर फुंकर घातली आहेस. खरं सांगू  या कालचक्राच्या रहाटगाडग्या मधून , चरितार्थाच्या गतीत, सतत काही ना करण्याच्या उर्मीत आज ३१ डिसेंबर कधी आला ते कळलच नाही.

अन आता एकदम मन अंतर्मुख झालंय, एकदम रिकामं रिकामं वाटतंय. 

माझ्यातली तीव्र संवेदन क्षमता आणि प्रकाश झोत अंधुक झाल्यासारखं वाटू लागलंय. कुणीतरी जाणार हेच मन आताशा मानत नाहीये. 
अरे आपला बाप्पा पुढच्या वर्षी येण्याचं वचन देऊन जातो तरी आमचे डोळे पाणावतात, अगदी ५ दिवस आमच्या सोबत असला तरी.
मग मला सांग गेले वर्षभर ३६५ दिवस तू साथ दिली आहेस आणि आता जाण्याचा दिवस आलाय... तो ही परत कधीच न येण्यासाठी! 

खरच अगदी भरून आलंय, हे असं का व्हावं...

हे वर्ष, ह्या वर्षातल्या बऱ्या वाईट घटना, दुःख व मानापमानाचे प्रसंग, कटू शब्द, आजवर जगलेले सर्व आयुष्य....या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली म्हणून असेल कदाचित! गत वर्षाचं, कटू व गोड गतानुभवांचं, दुःख वेदनेचे विसर्जन करायला जमेल आपल्याला, या जाणिवेने सुद्धा कढ आले असतील...

असो, पण हे मित्रा तू मला तुझ्या कारकिर्दीत खूप सांभाळून घेतलंस, अरे मोडून पडलेल्या या मित्राला इतरांप्रमाणे तू पण हात दिलास... अरे गेल्या १ वर्षाची मैत्री आपली पण तू खरच चांगली निभावलीस. तुझ्या दोन भावांनी म्हणजे २०१५ व २०१६ नी तर मला अक्षरशः तारून नेलं. 

मला माहिती आहे, मी तुला अधून मधून भेटत जा म्हंटल तरी ते शक्य नाही, ब्रम्हदेवाच्या कालमापन प्रोटोकॉल मध्ये बसत नाही ते.....

असो, थँक्स... गुडबाय... टेक केयर

अलविदा २०१७  🙏


© प्रमोद जोशी

फुलपाखरांचे अंतरंग - ३

फुलपाखरांचे अंतरंग -३

हे सॅम, hi

Hi, मानस, आज एकटाच, वैदेही कुठंय!

अरे, समीर! येईल ती , म्हणजे निघालीय, पोहोचेल.

बरं बाकी सगळी कुठं आहेत, आज प्लॅन फिक्स आहे ना celebration चा!

अलबत, हे काय विचारणं झालं का?

ओके. समीर, ग्रेट!

ये ती बघ वैदेही पण आली, hi वैदेही!

Hi मानस, hi समीर!

बरं चला उशीर झालाय आधीच पटकन जाऊ या कॅन्टीनमध्ये!

कॅन्टीन मध्ये आधीच बाकी सगळे जमा आहेत ते बघून... hi friends! Good morning,

गुड मॉर्निंग वैदेही,

"काय अमित , वर्षाला आज निरोप द्यायचा ना !, आं आं काय!" वर्षाकडे तिरप्या नजरेने बघत गौरव म्हणाला.

"तू न गौऱ्या आता मार खाणार आहेस, बरेच दिवस धुतला नाही तुला..." अमित म्हणाला.

"मी कुठं काय केलंय, मी आपलं वर्षाला निरोप द्यायचं म्हणत होतो... ह्या ह्या वर्षाचा कंटाळा आला न आता.." वर्षाकडे बघत गौरव म्हणाला.

"गौरव !" वर्षानं गौरवला डाव्या हातानं एक सपाटा दिला.

काही सेकंद शांतता ... फक्त कॅन्टीन मधील किचन म्युझिक.

"ये वर्षा, बघ ना बघता बघता एक वर्ष संपलं, आणि नवीन वर्ष सुरु होतय...काही तासात." वैदेही म्हणाली

 "हो ना कधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन .... पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत असतं नै ... " समीर म्हणाला.

"खर तर काय बदलत ? कॅलेंडरच पान पालटतो आपण नेहमीसारखे .... पण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतुहलाने ..." मानस म्हणाला,

" दोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते , या वर्षीचा संकल्प काय करायचा ....????? संकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड ... याच विचारात होते आणि वाटलं , नव्या वर्षाला काय वाटत असेल येताना ???? " वैदेही म्हणाली.

"चुकून काही भावना किंवा बुद्धी असेल च त्याला , तर नवीन वर्ष काय Feel करत असेल १ January ला !!!???" केतन म्हणाला,

"खूष होत असेल की घाबरत असेल ??? जाणार वर्ष काही हितगुज करत असेल का नव्या वर्षाशी ??? मोठ्ठ्यांनी सल्ला देण्याचा रिवाज ' वर्ष ' पण पाळत असतील का ???? खूष होत असेल न येणार वर्ष ,आपल आगमन धुमधडाक्यात साजर होतंय हे बघून , गर्व वाटत असेल त्याला ही थोडासा !!!" अमित म्हणाला.

"म्हणजे काय अमित, नक्कीच वाटत असणार ; " वर्षा म्हणाली,

"ठरवत असेल का एखाद वर्ष , आपण एखाद्या माणसाला काय देऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं त्याच्याकडून ????  , कदाचित घाबरत ही असेल एखाद वर्ष ... भीती वाटत असेल त्याला त्याच्या स्वतःच्याच नशिबाची ...!!", केतन म्हणाला.

"हो ना आपण lucky नाही ठरलो तर एखादा माणूस नेहमीच आपल्याला ' फालतू वर्ष ' म्हणून लक्षात ठेवेल या भितीन , झोप लागत नसेल वर्षांनाही ...!!! हो ना वर्षा," अमित म्हणाला,

"एखाद वर्ष अविस्मरणीय ठरत असेल खूप सुखाचे चार क्षण देऊन , खूष करून टाकत असेल एखाद वर्ष माणसांना ...!!!" मानस म्हणाला,

" वर्षहि उत्सुकतेन वर्तमानपत्रात भविष्य बघत असतील .... आपल्याला काय काय करायचं याच Time -Table ठरवत असतील त्यानुसार ...!!! एखाद वर्ष चिडत असेल आदल्या वर्षावर , त्यान स्वतःच एखाद काम आपल्यावर ढकललं म्हणून .... " गौरव म्हणाला,

"किंवा एखाद वर्ष खूष होत असेल , मागच्या वर्षीच्या प्रयत्नांच फळ आपल्या काळात मिळाल म्हणून !!! " केतन म्हणाला.

"अरे हो हो हो, हे काय चाललंय, माझ्या तत्वज्ञानी मित्रानो,आपल्याला व्याख्यानाची तयारी नाहीये करायची...." समीर म्हणाला,

" बरं ते जाऊ दे ... सध्यातरी ३१ च celebration काय करायचं हे ठरवू या, नाही का? .... " वैदेही म्हणाली,

"आणि समीर हे काय तन्या कुठंय! " वर्षा म्हणाली,

"ते बघा, शंभर वर्षे आयुष्य आहे तुला ...!!!!" तन्याकडे पाहत मानस म्हणाला.

"तर friends,आता कोरम भरलाय, तेव्हा.....ए गौऱ्या तोपर्यंत १० वडे सांग..." समीर म्हणाला,

"पुरतील ना तेवढे, का आणि १० सांगू..." अमित म्हणाला, आणि हास्याचे फवारे उडाले.


© प्रमोद जोशी