Tuesday, 17 October 2017

सुरेल मैफिलीची दिवाळी पहाट

दिवाळी तीच आहे. साजरी करणारी माणसे म्हणजे पिढी फक्त बदलते आहे. पिढी नुसार साजरी करण्याचे तंत्र बदलत चालले आहे. गत काही वर्षात तरुणांमध्ये संगीत, गायन-वादन शिकण्याचे वेड वाढले असून, त्याचाच हा परिपाक आहे की, दिवाळी पहाट ही संगीतिक सप्तसुरांनी रंगतदार ठरते आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल करण्याकरिता लोकनेत्यांपासून अनेक सामाजिक संस्था, उद्योजक, सेलिब्रेटीही पुढाकार घेत आहेत. मुंबईसह बहुतांश सर्व शहरांतून विविध गायकांच्या गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत दिवाळीची सुरुवात होते. सुरूवातीच्या काळात फॅड म्हणून हिणवली गेलेली दिवाळी पहाटेच्या संगीत मैफलींची परंपरा आता चांगलीच मूळ धरू लागली आहे. किंबहुना तिने चांगलाच तग धरला आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ‘चतुरंग’ संस्थेने सुरूवातीला मुंबईत दिवाळीच्या पहाटे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ नाटकाचा प्रयोग केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीच्या सकाळीही रसिक कार्यक्रमासाठी घराबाहेर पडू शकतात, हे या प्रयोगास मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आढळून आले. ‘चतुरंग’ने अशा रितीने दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याचा मार्गच जणू  रसिकजनांना दाखवून दिला. दिवाळी हा तसा कौटुंबिक, आप्तस्वकियांसोबत साजरा केला जाणारा सण. पहाट मैफलींनी दिवाळीला सार्वजनिक अधिष्ठान दिले. एक आगळी वेगळी प्रतिष्ठा मिळवून द्यायचा प्रयत्न केला. या मैफलिनी रसिकांना एकत्र करून दिवाळीचा उत्साह संगीताच्या, गाण्याच्या संगतीत एकमेकांना वाटण्याची संधी दिली. एरवी नरक चर्तुदशीच्या पहाटे रेडिओवर लागणारे नरकासुराचा वध हे कीर्तन ऐकत अभ्यंगस्नान, आधी देवपूजा आणि मग अर्थात पोटपुजा.. हे दिवाळीचे घराघरातील पारंपरिक वेळापत्रक पहाटेच्या संगीत मैफलींनी बदलले.आता पहाटे चारला उठून, अभ्यंगस्नानासह सर्व अन्हिके उरकून सहा-साडेसहाला रसिक गाण्याच्या मैफलीला सभागृहात जागा अडवितात. मुंबई परिसरात सुरू झालेली दिवाळी पहाट संगीत मैफलींची परंपरा आता महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठय़ा शहर, उपनगरांमधून रूजू लागली आहे. अनेक नामवंत आणि दिग्गज गायकांबरोबरच नवोदित कलावंतही दिवाळीच्या दिवसात उपलब्ध झालेल्या या नव्या व्यासपीठावर आपली कला सादर करतात. शास्त्रीय-उपशास्त्रीय, सुगम संगीत, चित्रपटसंगीत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम दिवाळीच्या काळात होतात. पहाटेच्या या मैफिलींमध्ये गाण्याबरोबरच रुचीपालट म्हणून खमंग गप्पा, सुसंवाद यांचाही बेत आखला जातो. पूर्वी ऑस्केस्ट्रामध्ये मिमिक्री असायची, तशा या गप्पा. व्यावसायिक नाटक, दूरचित्रवाणी मालिका अथवा सिनेसृष्टीतील अभिनेता-अभिनेत्री या गप्पाष्टकात सहभागी होतात. एवढय़ा भल्या पहाटे गाणं ऐकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रसिकांच्या हाती चहाफराळ देण्याची कल्पकताही काही आयोजक दाखवितात.
आणि मग अस म्हणावसं वाटतं...

कसा करावा उत्सव
मैफिल सांगून गेली
रसिकांची मने उत्सवात
शतशः रंगून गेली...


© प्रमोद जोशी

उत्साहमयी दीपोत्सव

दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनातील सर्वाधिक मोठा व आनंदाचा असून प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचं स्नेहपूर्वक संवर्धन करतो. दिवाळी....किती आनंद. केवळ कुटुंबातच नाही. सा-या धरणीवर. जिथे नजर जाते तिथे. कोपरान् कोपरा उजळलेला. मनाला आनंद देणारी तरी बोचणारी थंडी. उबदार हवा. सूर्यांची किरणे हवीहवीशी वाटणारी. तरीही दुपारी थोडी तापविणारी. शरीरावर नाजूकपणे पसरणारी. पावसाळ्यात ओल्या झालेल्या मातीला थंडावा देणारी. शेतीत लावलेल्या बीजाला अंकूर फुटविणारी.
 
दिपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव असतो... नात्यांचा सण ! दिवाळीच औचित्य साधून घरादारात, रस्त्यांवर, उद्यानात, पारंपारिक वास्तुत, सार्वजनिक स्थळांमध्ये हजारो दिवे लावून दिपोस्तव साजरा केला जातो. नात्यातला ओलावा टिकून राहण्यासाठी दिवाळी एक हक्काचा उत्सव.

दिवाळी म्हणजे चैतन्य,
दिवाळी म्हणजे उत्साह,
दिवाळी म्हणजे धमाल,
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे रोशनाई,
दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या भेटीगाठी
दिवाळी म्हणजे भेटवस्तू, मिठायांची देवाणघेवाण,
दिवाळी म्हणजे शुभेच्छापत्र, रांगोळ्या अन अभ्यंगस्नान

दिवाळीचा महोत्सव खरच काही खास असतो, नेत्रदीपक चैतन्यदायी असे वातावरण असत,  ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान येणारा हा उस्तव सात दिवसांचा...पण त्यातले चार दिवस अधिक जल्लोषात साजरे केले जातात, प्रत्येक दिवसाच आगळ वेगळ महत्व.
    अश्विन कृ. एकादशी म्हणजेच रमा एकादशीला पहिला दिवा लावण्याची अगदी जुनी प्रथा,
दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा म्हणजेच वासुबारसेचा, ह्या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, सवाष्णी गोमातेला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात, मग गोमातेला वंदन करून पुढील सुखकर आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले जातात. गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव सामावले असल्याची श्रद्धा असल्याने गोमातेला केलेले वंदन थेट तेहतीस कोटी देवांपाशी पोहोचते असे मानतात.
त्या नंतर येते ती धनत्रयोदशी , ह्यादिवशी देवांचे वैद्य 'धन्वंतरी' ह्यांची पूजा होते. ह्यादिवाशीच यमदीपदान असते. यमासाठी कणकेचा दिवा लावला जातो. यमाची दिशा 'दक्षिण' म्हणून हा दिवा दक्षिणेला ज्योत येईल अश्या पद्धतीने ठेवला जातो.
                 दुसऱ्या दिवशी येते ती नरकचर्तुदशी, हीच दिवाळी पहाट! अशी दंत कथा आहे की ह्या दिवशी जो सूर्योदयानंतर उठेल किंवा स्नान करेल तो नरकात जाईल. वास्तविक स्वर्ग, नरक ह्या सर्व कल्पना माणसाच्याच पण काही का असेना दिवाळीच्या पहाटे पहाटे उठून आईकडून सुगंधित तेल, उटन लावून घ्यायच आणि मग कढत्या पाण्याने स्नान! वाह !!!! दिवालीका मजाही कुछ और है! दिवाळी पहाटे  नवीन नवीन कपडे घालून घर पणत्यांनी भरून टाकायचं.. त्यानंतरच  देवदर्शन, कुटुंबासमवेत यथेच्छ फराळ, गप्पा टप्पा जवाब नही!
              नंतरच्या दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन, लक्ष्मी घरी नांदावी म्हणून तिची पूजा केली जाते.
             त्यानंतरचा दिवस म्हणजे कार्तिक शु. प्रतिपदा, बलिप्रतिपदा किंवा  पाडवा नवीन जोडप्यातील नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी आणि जुन्यांमधला आहे तसाच टिकवण्यासाठीचा खास दिवस! ह्यादिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. दुकानदारांसाठी हा वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यांच्या जमाखर्चाच्या वहीची पूजा आदल्या दिवशी केली जाते. बळी राजा ह्याच दिवशी दैत्यांवर विजय मिळवून परतला होता त्यामुळे ह्या दिवशी बळी राजाचेही स्मरण केले जाते.
             त्या नंतर येते यमद्वितीया किंवा भाऊबीज , भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्या कडून ओवाळून घेतो, अस म्हणतात ह्या दिवशी यमही त्याच्या बहिणीकडे यमिकडे जाऊन ओवाळून घेतो.
ह्या चारही दिवसातले खरे सार, आणि आकर्षणाचा विषय म्हणजे दिवे... पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लावून जमीन, आकाश उजळवून टाकले जाते.
एकूणच हा दीपोत्सव आनंदाचा, प्रसन्नतेचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा घेऊनच येत असतो. काळानुसार बदल होत गेला त्यामध्ये. आता चाळीतली दिवाळी जरी सर्वत्र पहायला मिळत नसली तरी तिची आठवण मात्र येत राहते किंबहुना ती मुद्दाम करून दिली जाते नव्या पिढीसाठी उठा उठा दिवाळी आली .... असं म्हणत म्हणत.

दिवाळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!