Thursday 21 September 2017

नवरात्रोत्सव करू या आनंदे !!!

आज घट स्थापना. नवरात्राची सुरुवात. नवरात्र म्हटले की देवीची आराधना आणि व्रतांची आठवण होते. दरवर्षी येणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याविषयी किमान माहिती असायला हवी. यंदा २१ सप्टेंबर रोजी गुरुवारी आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदेला घटांची स्थापना होणार आहे. यावर्षीचा मुहूर्त, देवीचे व्रत कसे करावे याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या नऊ रात्री देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रांची पारायणं केली जातात. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.

येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात आणि आपले जीवन सुरळीत व्हावे यासाठी वरदान मागतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.


© प्रमोद जोशी