विंदा आजोबा , अहो विंदा आजोबा
कुठे गेलेत हे सकाळी सकाळी, आज बाबा पण लवकर गेलेत ऑफिस ला, तिकडे अनिल दादा पण लवकर गेलाय असं मानस म्हणाला. खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि भरपुर काम दिसतंय एकंदरीत.
वैदेही अगं वैदू बाळा आवरलं का ग तुझं,
अहो विंदा आजोबा कुठे होतात तुम्ही, मी केव्हापासून शोधतेय तुम्हाला.
अगं बेटा आज कोजागिरी आणि दुधात साखर म्हणजे गुरुवार. दत्त दर्शन करून आलो. येतांना दूध व दुध मसाला पण घेऊन आलो. तुझे बाबा येईपर्यंत फक्कड दूध बनवीन. तुझ्या दादाला तर खूप आवडते मसाला दूध आणि बाबांना तर खूपच.
पण त्यांना जास्त देऊ नका बरं का विंदा आजोबा, त्यांना नंतर त्रास होईल. मला खूप काळजी वाटते त्यांची.
हं मुलांनी बाबाची काळजी करायची आणि बाबानी मुलांची. देवा काळजीच पीक तुझ्याकडे जास्त आहे का रे, म्हणून तू सगळ्यांना अगदी मोफत वाटत सुटला आहेस.
तुम्ही नं विंदा आजोबा खूप छान बोलता, असं वाटतं की तुम्ही बोलावं आणि मी ऐकत रहावं. कुठून मिळालं एवढे ज्ञान आणि संस्कार तुम्हाला. अगं एवढं मोठ्ठ आयुष्याचं विद्यापीठ आणि अनुभवरूपी गुरू सर्व काही शिकवून जातं बेटा.
विंदा आजोबा, एक विचारू.
अगं बेटा, एक काय दहा विचार, का गं काही अडचण आहे का, नाही म्हणजे माझ्या आवाक्यातली असेंल तर मार्ग काढू शकेन.
नाही नाही विंदा आजोबा मला कोजागिरी बद्दल फारसे काहीच माहीत नाही, म्हंटल तुमच्या कडून मिळवावी माहिती.
हात्तीच्या, एवढंच ना, सांगतो की माहिती, ऐक बेटा-
चांदणं अंगावर घेत रात्र जागवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी. भारतीय सण ऋतुमानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. प्रसन्न शरद ऋतूच्या आगमनात साजरा होणारा दिवस म्हणून कोजागरीची ओळख आहे. हा दिवस आश्विन प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणून तिला आश्विन पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आकाशात ढगाआड लपलेला चंद्र आपले दर्शन देतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो आणि चंद्राच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा मसालेदार दुधाचा आस्वाद घेत उत्साहात साजरी केली जाते.....
कोजागरीच्या रात्री देवी महालक्ष्मी ‘को जागर्ति’ असे विचारत प्रत्येक घराघरात डोकावते. कोण जागे आहेत ते पाहते. जे जागे आहेत त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. येथे नुसते ‘जागे राहणे’ हे अभिप्रेत नाही. जागे राहणे म्हणजे ‘न झोपणे नव्हे’ तर जागृती, सावधानता. कोजागरीच्या रूपाने प्रत्येक घरात डोकावणारी ही लक्ष्मी या जागृतीचे प्रतीक आहे. कोजागरी म्हणजे ‘जागृतीचा संदेश.’शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये यासाठी सुवासिक जल, थंड पेयं घ्यावीत, चंदप्रकाशात बसावं, मोत्याच्या माळा धारण कराव्या आणि चंदनादी शीतदव्यांचे लेप करावेत असं सांगितलं आहे.....
आपली कालगणनाच मुळी चंद्रकलांवर आधारलेली. चंद्राला सर्वोच्च मान मिळालाय तो आपल्या कालगणनेकडून. मराठी पंचांगात प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व आगळेवेगळे.... कोजागरी पौर्णिमा ही आपल्या प्रत्येक पूर्ववत पौर्णिमेकडून शौर्य, ज्ञान, सेवा, श्रद्धा, प्रेम इत्यादी गुण आत्मसात करून आपल्याला देते...!!! आश्विन पौर्णिमेला चंद्राची किरणे अतिशय शांत असतात. ती अंगावर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. आयुर्वेदातही त्याचे महत्त्व सांगितले आहे म्हणूनच या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे......
बाप रे, विंदा आजोबा किती छान समजावून सांगितलं तुम्ही, तुम्ही तर खरं म्हणजे प्राध्यापक व्हायला पाहिजे होतात.
नाही ग, काहीतरीच काय, वाचन आणि अनुभवाची शाळा यातून जे मिळाले ते साठवून ठेवलं , बाकी काही नाही
तुम्ही न विंदा आजोबा चालतं बोलतं विद्यापीठ आहात.
वैदू बेटा, पुरे हं , उगाच या म्हाताऱ्या ला हरभऱ्याच्या झाडावर बसवू नकोस.
नाही हो , विंदा आजोबा, खरच तुम्ही ज्ञानी आहात.
बरं तू कॉलेज ला जाणार आहेस ना? मी पटकन नाश्ता गरम करतो. तुझा बाबा पण आज लवकर गेला ऑफिसात म्हणून लवकरच केला, सगळे खाऊन गेले म्हणजे बरं वाटतं.
वैदू बेटा, तुझा बाबा तुला काही बोलला का ग, नाही म्हणजे आजकाल तो जरा गप्प गप्प असतो, टेन्शन मध्ये दिसतो.
नाही काही बोलले बाबा, पण तुम्ही म्हणता ते मला पण जाणवतंय विंदा आजोबा.
आणि ऐक ना वैदू बेटा, मी ना आज दत्त गुरूंना प्रार्थना केली की, आमच्या वैदू बाळाचं म्हणजे बाबांच्या फुलपाखराचं सर्व काही चांगलं होऊ देत.
विंदा आजोबा , खरंच खूप खूप थँक्स, असे आजोबा सर्वाना मिळोत.
आणि मनातला मानस त्याचं काय?
आं आं, काय हो विंदा आजोबा,
अरेच्या लाजून पळाली वाटतं
पण पोर फार गोड आहे, मानस लेकाचा लकी आहे.
No comments:
Post a Comment