अमिताभ बच्चन...! सात जादुई अक्षरं आणि दोन भारदस्त शब्द. अमिताभ म्हणजे सूर्य. हिंदी चित्रपटसृष्टीच्या क्षितिजावर उगवलेला. रूपेरी पडद्यावरील आपल्या तेजोमय अस्तित्वानं थिएटरमधल्या अंधारात तुमच्या-आमच्या भोवतीचं अप्रकाशित वलय प्रकाशमान करणारा. तुमचा-आमचा आवडता अमिताभ बच्चन...! अमिताभ बच्चन हे खरं तर केवळ दोन शब्द किंवा सात अक्षरं नाहीत. ते एक संपूर्ण वाक्य आहे. अभिनेता, स्टार, संवेदनशील व्यक्ती, सुसंस्कृत माणूस अशा कोणत्याही संज्ञेची ती दोन शब्दांतील व्याख्या आहे. का आवडतो अमिताभ इतका? कारण पडदा व्यापून राहणारं त्याचं अस्तित्व प्रेक्षक म्हणून आपल्याला दिलासा देतं आणि जगण्याच्या संघर्षात सर्वसामान्यांना कायमच येणारी आगतिकता आभासी जगात का होईना, विजयात परिवर्तित होते.
अमिताभ आला, त्या काळात राजेश खन्नापासून धर्मेंद्रपर्यंत आणि जितेंद्रपासून शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, शशी कपूर किंवा विनोद खन्नापर्यंत ‘हीरो’ मटेरियल असलेले अनेक जण होतेच की! देव आनंदही अजून कार्यरत होता; पण या सगळ्यांचं पडद्यावरचं किंवा बाहेरचं अस्तित्वही ‘चार्मिंग’ या सदरात मोडणारं होतं. अमिताभ मात्र हा असा एक चेहरा होता, ज्याला सामान्य माणसानं ‘रिलेट’ केलं.
सत्तरच्या दशकापासून सुरू झालेला अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’चा प्रवास नव्वदच्या ‘अग्निपथ’, ‘हम’पर्यंत कायम राहिला. खरं तर ‘जंजीर’च्या आधी अमिताभनं केलेले अकरा-बारा सिनेमे हे त्याच्या नंतर तयार झालेल्या प्रतिमेशी पूर्ण विसंगतच आहेत. ‘सात हिंदुस्तानी’पासून सुरू झालेला त्याचा प्रवास अपयशाचाच होता. ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’मध्ये दखल घेतली गेली, तरी ते सिनेमे त्याच्यापेक्षा जास्त राजेश खन्नाचेच होते. एक वेळ तर अशी होती, की अमिताभ बाडबिस्तरा गुंडाळून मुंबई सोडून जायचा विचार करत होता. कोलकात्यातली सुखाची नोकरी सोडून मुंबईत आला, तोच मुळी आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन! आपल्याला अभिनयच करायचा आहे, असं आतून वाटल्यानंतर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी रूढार्थानं ‘सेटल’ झालेल्या आयुष्यापासून फारकत घेऊन नव्या स्वप्नामागे धावणं हे काही सोपं नाही. अमिताभनं ते केलं. फ्लॉप झालेल्या सलग ११ सिनेमांचं अपयश त्यानं पचवलं आणि तो टिकून राहिला. ‘अँग्री यंग मॅन’ची इतकी स्ट्राँग प्रतिमा निर्माण होण्यामध्ये सलीम-जावेद यांच्या लेखनाचा जितका वाटा आहे, तितकाच कदाचित त्याच्या या स्ट्रगलचाही आहे. त्याच्या डोळ्यांतला अंगार, भारदस्त शरीरयष्टी नसली, तरी देहबोलीत असलेला आत्मविश्वास आणि आवाजातलं ‘कन्व्हिक्शन’ या गोष्टी पराभवालाही पराभूत करणाऱ्या वाटतात, त्या त्यामुळेच.
सभोवतालची परिस्थिती ‘गब्बरसिंग’ किंवा ‘प्रेम चोप्रा’सारखी अंगावर येते, तेव्हा त्याला सामोरं जाण्यासाठी ‘विजय’च लागतो. समकालीन इतर हीरोंच्या सिनेमांत ‘रोमान्स’च्या दरम्यान केवळ औपचारिकता म्हणून हाणामारीची दृश्यं येत असताना, अमिताभचे चित्रपट मात्र संघर्षाच्या कथाबीजांवरच उभे राहिले. ‘जंजीर’मध्ये पोलिस स्टेशनमध्ये आलेला गुंड खुर्चीत बसण्यापूर्वीच त्याची खुर्ची लाथेनं उडवणारा आणि ‘जब तक बैठने को कहाँ न जाये, खडे रहो’ असं बोलणारा पोलिस अधिकारी पब्लिकला त्या वेळी हवा होता. अमिताभच्या रूपानं पडद्यावर का होईना, त्यांचं हे स्वप्न साकार झालं. इतका लंबू हीरो त्यापूर्वी पब्लिकनं कधी पाहिला नव्हता, असा बुलंद आवाज ऐकला नव्हता, डोळ्यांच्या असल्या भाषेशी प्रेक्षकांची याआधी कधी ओळख नव्हती आणि स्वप्नं विकणाऱ्या जादूगाराशी अशी सलगी त्यांनी कधी केली नव्हती. पडद्यावरच्या नायकाशी रिलेट होणं, ही नवीनच गोष्ट प्रेक्षक करू लागले. अस्सलपणाला ‘कमर्शियल व्हॅल्यू’ देणारी ती खास अमिताभी अदाकारी होती.
नव्वदच्या दशकामध्ये आपल्यातलं हीरोपण संपलंय आणि ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेची गरजही, याचंही नेमकं भान अमिताभला होतं. नव्वदच्या दशकामध्ये आपल्यातलं हीरोपण संपलंय आणि ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेची गरजही, याचंही नेमकं भान अमिताभला होतं. म्हणूनच ‘कौन बनेगा करोडपती’पासून परवाच्या ‘पिंक’पर्यंतच्या त्याच्या भूमिका त्याच्यातल्या ‘सुलझा हुआ’ कलाकाराचीच साक्ष देतात; पण तरी आमच्यासारख्या निस्सीम चाहत्यांना थिएटरमधल्या अंधारात चाचपडायला झालं, की अजूनही आठवतो तो ‘दीवार’मधला डायलॉग. थेट गुंडांच्या साम्राज्यात जाऊन त्याला आव्हान देत तो म्हणतो, ‘तुम मुझे वहाँ ढूँढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था।’ आम्ही टाळ्या पिटतो, शिट्ट्या वाजवतो, आनंदतो आणि म्हणतो, ‘आया, अमिताभ आया'.
अजूनही आठवतात ते टाळ्या घेणारे ते बंदया रुपायासारखे खणखणीत डायलॉग,
जाओ, पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरे बाप को चोर कहा था. पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरी मां को गाली दे के नौकरी निकाल दिया था. पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरे हाथ पर ये लिख दिया था... ये... उसके बाद, उसके बाद मेरे भाई तुम जहां कहोगे, मैं साइन कर दूंगा
आई कैन टॉक इंग्लिश, आई कैन वॉक इंग्लिश, आई कैन लाफ इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज ए वेरी फनी लैंग्वेज.
हम जहाँ खडे होते हैं line वहीं से शुरु हो जाती हैं
75 व्या वाढदिवसाच्या आपल्या बिग बी ला मनापासून शुभेच्छा
No comments:
Post a Comment