सहज आठवलं...
मागे एकदा दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती... काहीशी अशा आशयाची ..
कोल्हापुरात खपात 'सकाळ' नंबर वन'
लगेच दुसऱ्याच दिवशी ‘दै. पुढारी’ने पण इंडियन रिडरशिप सर्वेचा दाखला देत प्रत्त्युत्तर केलं होतं...
“दुपटीहून अधिक वाचकसंख्येने पुढारीच्या निर्विवाद वर्चस्वावर पुन्हा शिक्का मोर्तब”
खरं तर या सगळ्याला सुरवात तशी बऱ्याच आधीपासून झाली होती. म्हणजे बघा पुढारीने जेव्हा पासून पुण्यात पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासून या वादाला तोंड फुटत गेलं. कदाचित आपण सगळ्यांनी हे याची देही याची डोळा बघितलेच असेल; पुढारीने ज्यावेळी पुणे आवृत्ती चालू केली त्यावेळी त्यांची जाहिरातच काहीशी अशी होती
“आता ‘सकाळचं’ पाहिलं काम ‘पुढारी’ वाचायचं!!!”;
पी एम टी च्या अनेक बसेसवर हि जाहीरात त्यावेळी झळकत होती. आता पुढारीने अशी जाहीर कुरापत काढल्यावर सकाळ कसं गप्प बसेल?
गपा की राव!!!
त्यांनी मग कोल्हापूर आवृत्तीचे दर बिझनेस पोलीसी च्या नावाखाली कमी केले आणि मग ‘मिडिया वॉर’पेटलं; जवळपास आठवडा भर कोल्हापुरात हे धुमशान चालू होतं. पुढारीने विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा मुद्दा हाताशी धरून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेला आपल्या बाजूने केलं; आणि मग काही वृत्तपत्र विक्रेत्यानी दै. सकाळ वर बहिष्कार टाकला.
दै. सकाळने हि मग माघार न घेता वितरणाची समांतर यंत्रणाच उभी केली. प्रथम नाव न घेता होत असलेल्या टीका नंतर वैयक्तिक पातळीवर होऊ लागल्या. याचाच परिपाक म्हणून सकाळ कोल्हापूर आवृत्ती चे संपादक पद दस्तूर खुद्द अभिजीत पवारांकडे आलं.
वास्तविक पाहता या वादाचा इतिहास फार जुना; मला वाटतं जेव्हा पासून दै. सकाळ न कोल्हापुरात पाय ठेवला तेव्हांपासून या वादाची ठिणगी पडली असावी, त्याच्या अगोदर दै. पुढारीची आणि त्यांच्या“परीवारा”चीच कोल्हापुरात मोनोपॉली होती; त्याला सकाळने दिलेले आव्हान पुढारीला आवडले नसावे त्यामुळेच पुढारीचा हा डबल द्वेष जन्माला आला असावा.
पुढे काय झालं माहित नाही; पण साधारण काही दिवसांनी तो वाद बहुधा थंड झाला. लोकांचे फुकट मनोरंजन करण्यापलीकडे यातून काही साध्य झालं असेल असं काही वाटत नाही. पण परत परत ह्याच आशयाच्या बातम्यांनी हेच दाखवून दिले कि वाद जरी वरवर थंड झाला असला तरी आत कुठेतरी अजून ठिणगी धुमसते आहे.
आता पुढारी आणि सकाळ यात तुलना करायचीच झाली तर दोन्ही दैनिक वर्तमान पत्रे आहेत हा एक मुद्दा सोडला तर साम्य असे काही नाहीच.
सकाळ खरे तर ब्राम्हणी ढंगाचे पुणेरी दैनिक; सौम्य भाषेतून आशयपूर्ण आणि सृजनशील लिखाण बुद्धीजीवी लोकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा असलेले; तर पुढारी म्हणजे ‘अस्सल कोल्हापूरी’ चटपटीत भाषेत लोकांचे मनोरंजन करणारे दैनिक. दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग पूर्ण वेगळा पण तरीही त्यांच्या मधील हि इर्षा खरच अनाकलनीय आहे.
जाऊ दे आपल्याला काय करायचाय आपण तरी सकाळ आणि पुढारी दोन्ही पेपर रोज वाचतो तेहि इंटरनेट वर अगदी फुकटात; काय?
जाऊ द्या...
त्यांच्या त्यांच्यात काय घडतंय त्याच्याशी आपल्याला काय करायचंय.....
उगाच आपलं देणं ना घेणं अन कंदील लावून येणं...
आपण आपलं आपलेच सप्तरंग आणि आपलीच विविधा म्हणत त्यांना थोपटायच अंगाई गीत म्हणत...
नाई का?
© प्रमोद जोशी
No comments:
Post a Comment