नुकतीच वाचनात आलेली एक विलक्षण घटना.
गुहागर मुंबई ST बस एका धाब्यावरून जेवण करून निघणार होती. प्रचंड पाऊस पडत होता आणि दोन प्रवासी न चढल्यामुळे कंडक्टर त्यांना शोधायला छत्री घेऊन उतरला होता. केवळ दोघे आले नाहीत म्हणून बस निघू शकत नसल्याचे पाहून प्रवासी वैतागले होते.
"ओ मास्तर चला जाऊ द्या, त्यांना राहू द्या इथच पावसामध्ये!" एकजण वैतागून ड्रायव्हर ला म्हणाला. "तेच ना जहागीरदार आहेत काय, ST म्हणजे काय यांच्या बापाचा माल आहे काय?" आणखी एक जण हेल काढत पचकला. पण ड्रायव्हर महाराज शांत होते , त्यांच्यासाठी हे रोजचेच होते. त्यांनी एकसारखा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. आणि एकदाचे कंडक्टर साहेब त्या दोघांना घेऊन आले. सर्व प्रवासी एखाद्या कैदयाकडे पाहावे असे त्यांच्याकडे पाहू लागले.
आणि एकदाची बेल दोनदा वाजली आणि बस पावसात मार्गक्रमण करू लागली. मागून एक जीप भरदाव वेगानं बस ला ओव्हरटेक करून गेली. पण थोड्याच वेळात ती रस्त्यावरून उलट वळली व बस च्या दिशेने यायला लागली. नक्कीच काहीतरी वेगळे घडलंय याची ड्रायव्हर ला जाणीव झाली, त्याने बसचा वेग कमी केला व जीप वाल्याला विचारायचा प्रयत्न केला. पण जीप पुन्हा भरदाव वेगाने बसच्या उलट दिशेने निघून गेली. काहीच मिनिटांनी ड्रायव्हर च्या लक्षात आलं कि सावित्री नदीच्या पुलाच्या तोंडावर एक व्यक्ती हात करून थांबण्याचा इशारा करत आहे. त्याने गाडी जवळ नेऊन थांबवली तर त्या माणसाने सांगितले कि पूल मध्यावर तुटलाय आणि दोन बस व चार पाच गाड्या खाली कोसळून वाहून गेल्यात! ते ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर काटा आला. खरे म्हणजे त्या तिन्ही बस एकापाठोपाठ जातात. पहिल्या दोन बस निघून गेल्या पण या बसमधील दोन प्रवाशांनी पाच दहा मिनिटे यायला वेळ लावला व त्यामुळं सर्वांचा जीव वाचला.
थोडक्यात काय त्या दोघांच उशिरा येणं सर्वांच्या पथ्यावरच पडलं , नाही का?
© प्रमोद जोशी
No comments:
Post a Comment