कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यात बदामी शहरापासून सहा मैलाच्या अंतरावर 'चोलचगुडू' या नावाचं एक लहानसं गाव असून, तिथे 'शाकंभरी' देवीचं स्थान आहे. या भागाला प्राचीनकाळी 'तिलकवन' असं नाव होतं, असा उल्लेख स्कंदपुराण आणि देवी भागवतात येतो.
फार प्राचीन काळी एकदा या भागात शंभर वर्षांचा दुष्काळ पडला होता. तेव्हा अन्न- पाण्यावाचून सर्व प्राणिमात्र तडफडू लागले. मानवासह सर्व प्राणी भूक- तहानेने व्यावूत्ळ झाले. तेव्हा सर्व जीवमात्राचं पालनपोषण करणार्या दयामयी देवी भगवतीला करुणा आली आणि तिने सर्वांना वाचविण्यासाठी हे एक नवे रूप घेतले.
देवीनं आपल्या देहातून शाकभाजी अर्थात फळ, कंदमुळं निर्माण केली. त्याचबरोबर पाताळात जाऊन 'हरिद्रातीर्थाचं' पाणी आणून लोकांची क्षुधा तृष्णा भागवली. त्यांचं रक्षण केलं. देवीनं आपल्या देहातून शाकभाजी निर्माण केली म्हणून तेव्हापासून तिचं नाव 'शाकंभरी' असे पडलं.
शाकंभरी देवीला 'बदामी- बनशंकरी' असंही म्हणतात. तिलकवनात देवीनं पाताळातून हरिद्रातीर्थाचं पाणी आणल्यामुळे तिथं द्यान्य, भाजीपाला, झाडंझुडपं, फळांचे वृक्ष बहरले. लोकांना अन्नद्यान्यामुळं जीवदान मिळालं. मात्र, या क्षेत्राचा असा झालेला उत्कर्ष दैत्यांना पाहवला नाही. त्यांनी तिथे जाऊन अन्नद्यान्याची नासधूस करून सर्व लोकांना त्रास दयायला सुरुवात केली. तेव्हा देवीने वाघावर स्वार होऊन आपल्या नऊ कोटी सखींसह दैत्यांवर चाल केली आणि त्यांचा निःपात केला.
देवीचा हा पराक्रम पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हरिद्रातीर्थ आणि तैलतीर्थ यांच्यामध्ये देवीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली. तीच ही शाकंभरी देवी. ती वनामध्ये निवास करून राहिली म्हणून तिचं नाव 'बनशंकरी' असं झालं. तिलकवनात जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा देवीनं आपल्या शंभर नेत्रातून दयादृष्टी या भागावर टाकली आणि उत्तम पाऊस झाला म्हणून तिला 'शताक्षी' असंही म्हणतात, असा उल्लेख श्री शिवपुराणातल्या उमासंहितेत केला आहे.
शाकंभरी ही 'धन धान्य समृद्धीची' देवता आहे. तिच्याच कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणार्या जोमदार धान्य पिकांमध्ये मोत्यासारख्या टपोर्या दाण्याची कणसं अवतीर्ण होतात.
एकदा अरुण नावाच्या महाअत्याचारी असुराने स्वर्गातल्या देवांच्या पत्नीचं शील हरण करण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हा सर्व देवपत्नी आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी भ्रमराची रूपं घेऊन देवीभगवतीकडे अभय मागण्यासाठी आल्या. तेव्हा देवीनं 'भ्रामरी'चं रूप घेऊन अरुण दैत्याचा संहार केला. तेव्हापासून तिला 'भ्रामरी' हे नाव प्राप्त झालं.
देवी भगवतीच्या 'रणरागिणी स्वरूपातील' ही दोन महत्त्वाची रूपे म्हणजे 'शाकंभरी' आणि 'भ्रामरी'. देवीचं 'शाकंभरी' हे रूप अन्नपूर्णास्वरूप आहे. कर्नाटक प्रांतात ही देवी फार प्रसिद्ध असून, ती अनेकांची कुलदेवता आहे. पौष महिन्यात शुद्ध पक्षात अष्टमी ते पौर्णिमा असं या देवीचं नवरात्र करतात.
या देवी सर्व भुतेषु। क्षुद्यारुपेण संस्थिता।
नमः तस्यै नमः तस्यैः। नमः तस्यैः नमो नमः॥
© प्रमोद जोशी
No comments:
Post a Comment