Sunday 25 February 2018

अनएक्स्पेक्टेड एक्झिट

सिनेसृष्टीतली ‘चांदणी’ निखळली
‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातील ८ मिनिटांचा ‘चार्ली चॅप्लिन’चा प्रसंग आज तिने जगाचा निरोप घेतला आहे या बातमीवर विश्वासच बसत नाही. सहज सुंदर अभिनय आणि त्यातली निरागसता ही बहुदा श्रीदेवी जन्माला येतानाच घेऊन आली असावी. भूमिका जगणे काय असते ते जर बघायचे असेल तर श्रीदेवीचे सिनेमा पाहून आपल्याला कळते.


पाहताना आपली हसून हसून मुरकुंडी वळते. या प्रसंगाबद्दल असा एक किस्सा सांगितला जातो की जिम कॅरी या हॉलिवूड मधल्या कलाकारालाही श्रीदेवीचा हा अभिनय आवडला होता. आपण असे भाव चेहऱ्यावर कधीही आणू शकत नाही अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली होती.

सोलवा सावन मधून श्रीदेवीने १९७८-७९ च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत पुढची १८-१९ वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य करत राहिली. ‘सदमा’ या सिनेमातली मनोरुग्ण मुलीची भूमिका असेल तिचे ते कुत्र्याच्या पिल्लाला पाहून ‘हरिप्रसाद’ असे ओरडणे असेल. किंवा ‘चाँदनी’ सिनेमातली प्रियकरावर असीम प्रेम करणारी प्रेयसी असेल, ‘नगीना’ सिनेमातली इच्छाधारी नागीण असेल. सगळ्याच भूमिका श्रीदेवीने अजरामर केल्या. अत्यंत निरागस आणि सोज्ज्वळ भाव तिच्या चेहऱ्यावर आपसूकच आलेले दिसून येते. 

श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते. तिला एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा तिचा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. 

श्रीदेवीला ‘सदमा'(१९८४), ‘चांदनी'(१९९०), ‘खुदा गवाह'(१९९३), ‘गुमराह'(१९९४), ‘लाडला'(१९९५), ‘जुदाई'(१९९८), ‘इंग्लिश विंग्लिश'(२०१३) आणि ‘मॉम'(२०१८) या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच इतरही अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान करण्यात आला. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि सुंदर कारकीर्द असलेली श्रीदेवी यापुढे फक्त आठवणीत असणार आहे. तिच्या गाण्यांतून, सिनेमांतून ती आपल्याला भेटत राहील. सिनेसृष्टीतली ‘चांदणी’ निखळली असली तरीही प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान ध्रुवपदाइतकेच अटळ राहिल यात शंका नाही.

(  छायाचित्रे अंतरमहाजालावरून साभार    )

© प्रमोद जोशी