Sunday, 31 December 2017

प्रिय २०१७

प्रिय २०१७,


सस्नेह नमस्कार,

       गेल्या एक जानेवारीला तू आलास. २०१६ ची नाळ जोडूनच आलास... त्याचीही काही अर्धवट कामं सोबत घेऊन अगदी फाईली बरोबर घेऊनच. 

      तू वेगाने मार्गक्रमण करीत राहिलास. आज अखेरचा दिवस - ३१ डिसेंम्बर. प्रत्येक वर्षाला अखेर असते आणि दिवसाला एक रात्र. दिवस, संध्याकाळ, रात्र मध्यरात्र असा धावत धावत तू इथपर्यंत पोहोचलास. आज तू साथ सोडून जाणार हे खरंच क्लेश दायक वाटतंय. 

       एखाद्याच सोडून जाणं हे किती वेदना देणारं, क्लेश देणारं, मनाचा कोलाज बिघडवून टाकणारं  असतं हे किती जणांनी  तुझ्या साक्षीनच अनुभवलं  आहे. त्यांच्या  सर्व आप्त स्वकीयांप्रमाणच तू सुद्धा त्यांच्या  वेदनांवर फुंकर घातली आहेस. खरं सांगू  या कालचक्राच्या रहाटगाडग्या मधून , चरितार्थाच्या गतीत, सतत काही ना करण्याच्या उर्मीत आज ३१ डिसेंबर कधी आला ते कळलच नाही.

अन आता एकदम मन अंतर्मुख झालंय, एकदम रिकामं रिकामं वाटतंय. 

माझ्यातली तीव्र संवेदन क्षमता आणि प्रकाश झोत अंधुक झाल्यासारखं वाटू लागलंय. कुणीतरी जाणार हेच मन आताशा मानत नाहीये. 
अरे आपला बाप्पा पुढच्या वर्षी येण्याचं वचन देऊन जातो तरी आमचे डोळे पाणावतात, अगदी ५ दिवस आमच्या सोबत असला तरी.
मग मला सांग गेले वर्षभर ३६५ दिवस तू साथ दिली आहेस आणि आता जाण्याचा दिवस आलाय... तो ही परत कधीच न येण्यासाठी! 

खरच अगदी भरून आलंय, हे असं का व्हावं...

हे वर्ष, ह्या वर्षातल्या बऱ्या वाईट घटना, दुःख व मानापमानाचे प्रसंग, कटू शब्द, आजवर जगलेले सर्व आयुष्य....या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली म्हणून असेल कदाचित! गत वर्षाचं, कटू व गोड गतानुभवांचं, दुःख वेदनेचे विसर्जन करायला जमेल आपल्याला, या जाणिवेने सुद्धा कढ आले असतील...

असो, पण हे मित्रा तू मला तुझ्या कारकिर्दीत खूप सांभाळून घेतलंस, अरे मोडून पडलेल्या या मित्राला इतरांप्रमाणे तू पण हात दिलास... अरे गेल्या १ वर्षाची मैत्री आपली पण तू खरच चांगली निभावलीस. तुझ्या दोन भावांनी म्हणजे २०१५ व २०१६ नी तर मला अक्षरशः तारून नेलं. 

मला माहिती आहे, मी तुला अधून मधून भेटत जा म्हंटल तरी ते शक्य नाही, ब्रम्हदेवाच्या कालमापन प्रोटोकॉल मध्ये बसत नाही ते.....

असो, थँक्स... गुडबाय... टेक केयर

अलविदा २०१७  🙏


© प्रमोद जोशी