नुकतीच थंडी सुरु झालेली असते, दिवाळीचं आगमन होतं आणि त्यात दिव्याची उब घरादारात रेंगाळते.
सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हजारो दिवे लावून दिवाळीचे जल्लोषात स्वागत होते. पणत्यांबरोबरच आकाशदिवे लावून दिवाळीच स्वागत केल जात. बाजारात अनेक आकाराचे आकाशदिवे मिळत असले तरी घरी आकाशकंदील स्वतः करण्याची मजा काही वेगळीच.....शिवाय कल्पना शक्तीला आणि कलाकौशल्याला वाव...
दिवाळीच आणि रांगोळीच नात अगदी जुनंच बरका! दिवाळीच्या निम्मिताने घरासमोर, देवळात, आणि सार्वजनिक जागी लहान, मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेरची रांगोळी हे संस्काराच प्रतिक मानल जात, रांगोळीतले रंग घरातील सुख समृद्धीची जाणीव करून देतात.
दारात काढलेली रांगोळी ही मला तर पहिल्यापासूनच म्हणजे मला कळायला लागल्यापासून नेहमीच 'ग्रेट' काहीशी 'हटके' अशीच वाटत आली आहे. मला नेहमी असं वाटतं की ही रांगोळी आपल्याला काहीतरी सांगतेय, जणू काही ती सुखाचं प्रतीक आहे आणि आपल्याला मूकपणे सांगतेय 'मी सुखात आहे, तुम्हाला पण सुख मिळो'. व्वा, क्या बात है, आजकाल या धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात वेळ कुणाकडे आहे आपणास मिळालेल्या वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला? मला वाटतं रांगोळी हा सर्वात उत्तम मार्ग असावा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा व इतरांना शुभेच्छा देण्याचा, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा. 'सर्व काही मंगलमय होवो, सर्वांचे कल्याण होवो' हेच ती रांगोळी प्रत्येक ठिपक्यातून सूचित करत असणार.
बाजारात कितीही छान छान भेटकार्ड मिळत असली तरी आप्तेष्ट, नातलगाना देण्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेल्या अश्या शुभेच्छा पत्रकात काही वेगळच प्रेम असत, ते शब्दात नाही सांगता येणार. आजच्या मोबाईल संस्कृती मध्ये हे सगळं हरवत चाललंय.
© प्रमोद जोशी