सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे. या नवरात्रोत्सवाच मूळ काय? हा नवरात्रोत्सव पूर्णत: निगडीत आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेच सर्वप्रथम प्रकटलेल सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. का प्रकटली ती? तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी 'दुर्गम' नावाच्या असुरान घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतल. वर म्हणून त्यान, देवांच्या नाडया आखडणारे प्रत्यक्ष चारी वेदच मागून घेतले. परिणामी सर्व यज्ञ बंद पडले. सर्वत्र अनावृष्टीच भय पसरल. जागोजागीच्या आश्रमातील ब्रम्हवृंदांनी व्याकुळतेन आदिमायेची करूणा भाकली. ती शतनेत्रयुक्त रूप धारण करून प्रकटली. तिन उन्मत दुर्गम असुराला वधल. दुर्गमला वधल म्हणून ही दुर्गा. त्याचा 'दुर्ग' म्हणजे किल्ल्यांशी काहीही संबंध नाही. दुर्गेचीच दुसरी नाव काली, अंबा, भवानी अशी पुढे विस्तारीत झाली. दुर्गेच्या असुरांवरील विजयाच प्रेरणास्मरण म्हणून विजयादशमी.
दांडिया खेळता खेळता आपण या नऊ दिवस नऊ रात्री देवी मातेचा जागर करतो. देवीची मनोभावे पूजा व प्रार्थना करतो. शैलपुत्री, ब्रह्मचरिणी , चंद्रघंटा, कुशमांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धीदात्री अशा देविमातेच्या नऊ रुपामधल्या कार्याचं स्मरण करून तिच्यापुढं नतमस्तक होतो.
पण जरा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या देवी मातेप्रमाणेच आपल्या भोवतालच्या , आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्री मध्येही वेगवेगळ्या वेळी, निरनिराळ्या प्रसंगी याच देवी रूपाची झलक दिसते की नाही ते.
कधी ही स्त्री अंबा जगदंबे प्रमाणे माता असते. कधी नावाप्रमाणेच आपल्या आयुष्यात अन्न आणि समृद्धी घेऊन येणारी अन्नपूर्णा असते. कधी ती सर्वमंगला म्हणजेच पवित्र कल्याणकारी असते. कधी भैरवी प्रमाणे रौद्ररूप धारण करणारी, कधी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी भवानी आई, कधी भद्रकाली तर कधी कधी आपण तिच्या उंची पर्यंतही पोहोचू शकणार नाही अशी दुर्गा माँ.
खरं सांगा भेटतात ना आपल्यालाही अशी देवी रूपे आपल्या आजूबाजूच्या स्त्री मध्ये पण मग आपण करतो का या देवींची पूजा, पूजा राहू देत निदान आदर तरी.
आता केवळ मंदिरात किंवा घरात देवीची पूजा करून चालणार नाही, तर घरातल्या या वावरणाऱ्या देवीकडे अधिक लक्ष द्यावयास हवे. तिच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे आणि सुखाकडे पाहावयास हवे. तरच आपणांस ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती म्हणण्याचा खरा अधिकार प्राप्त होईल.
© प्रमोद जोशी