सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.
दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.
विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.
विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.